गायक

समाजशास्त्राचा एक विद्यार्थी म्हणून इतिहासकाळापासून जगात जे महत्वाचे बदल झाले त्यांचा आम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे भटक्या जमाती हळूहळू कमी झाल्या. लोक शेती करायला लागले. एका जागी स्थिर झाले. पुढे विज्ञानाचे युग आले, कारखानदारी सुरु झाली. जूने जग नाहीसे होऊ लागले. हिन्दी चित्रपटाचा इतिहास पाहू गेल्यास असेच बदल दिसू लागतात. अमिताभ युग सुरु होताना आद्य सुपरस्टार राजेश खन्ना युगाचा अस्त झाला होता. मात्र अशा काळात देखील एखादा दिलीपकुमार आपला आब शेवटपर्यंत राखताना दिसतो. कुणाचाही जमाना येवो प्राण, अशोककुमार, संजीवकुमार, नसीर, ओम पुरी यांना पर्याय नव्हतेच. पार्श्वगायनात लताचे साम्राज्ञीपद अढळ राहिले. लताचा अपवाद सोडल्यास चित्रपटसृष्टीने रफी युग पाहिले. किशोरकुमारचा उदय झाला. तरीही कभी कभीची गाणी मुकेशकडेच गेली. तसे तलतचे झाले नाही. नव्या जमान्यात तलतचा अस्तच झाला. हे विधान मी फक्त चित्रपटसंगीताच्या बाबतीत करीत आहे. हे नक्की कशामुळे झालं असावं?

तलतचा आवाज ऐकला की मनात काय येतं? एक सभ्य, सुसंस्कृत, सुशिक्षित, हळव्या स्वभावाचा भावनाप्रधान नायक. या स्वरात गाणारा माणुस मुलींची टिंगल टवाळी करणे, समाजाच्या विरोधात जाणे, सूड उगवणे अशा गोष्टी करण्याची शक्यता कमीच. उलट हा नायिकेला दुरुत्तरेही करणार नाही. अन्याय सहन करून हा नायक “जाये तो जाये कहां”, “अंधे जहां के अंधे रास्ते”, “मेरी याद में तूम ना आंसू बहाना”, “जिंदगी देने वाले सून” आणि “फिर वोही शाम वोही गम वोही तनहाई है” असे म्हणून आपल्या दुःखाला एकट्याने वाट करून देईल. राजेशखन्नाचा नायकही भावनाप्रधान होता. पण तो गाडीच्या खिडकीत बसलेल्या नायिकेला “मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू” म्हणत खट्याळपणा करू शकत होता. तलतचा नायक हे करणे शक्य नव्हते. जग बदलत चालले होते. पुढे सत्तरच्या दशकात भारतात बरीच उलथापालथ झाली.

एक युद्ध झाले. बेकारी वाढत होती. तरुण संतप्त होते. हा अंगार घेऊन अमिताभ नावाचा झंझावात येऊ घातला. “रो मत पुष्पा” हे म्हणणाऱ्या नायकापेक्षा पुष्पाच्या डोळ्यात आसवे आणणाऱ्याला चोपून काढणारा नायक लोकांना आवडू लागला आणि काकाचा अस्त झाला. जेथे खट्याळपणा करणाऱ्या नायकाचाही अस्त झाला तेथे तलतच्या परीटघडीच्या नायकाचा आणि आवाजाचा निभाव लागणे कठीणच होते. गंमत म्हणजे समकालिन मुकेशचा आवाज दिलिपकुमारलाही शोभून दिसला आणि अमिताभच्या कभीकभीतील शायरालाही फिट्ट बसला. तसे तलतच्या बाबतीत घडले नाही. हे रेंजमुळे झालं असावं. रफीचा आवाज कुठल्याही नायकाला आणि कुठल्याही प्रकारच्या गाण्याला चपखल बसत होता. तलतच्या आवाजाला येथे मर्यादा होत्या. तलतच्या आवाजात गाणाऱ्या नायकाचे एक विशिष्ट व्यक्तीमत्व पडद्यावर तयार होत होते अशी माझी प्रामाणिक समजूत आहे. त्यामुळेच तलतचा आवाज वापरण्यावर मर्यादा आली असावी. मात्र त्या आवाजाच्या मर्यादेत तलतला तूलना नाही हे देखील तितकेच खरे.

तलतचं एकेक गाणं म्हणजे एकेक कोरीव लेणंच आहे. “आंखोंमे मस्ती शराब की”, “आंसू समझ के क्यूं मुझे”, ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल”, बेचैन नजर बेताब जिगर”, फिर वोही शाम वोही गम”, मै तेरी नजर का सुरुर हूं”, सबकुछ लुटा के होश में आये तो क्या किया”, “अश्कों में जो पाया है”, “प्यार पर बस तो नही है मेरा लेकीन फिर भी”, “दिल मतवाला लाख सम्हाला”, “हमसे आया न गया”, “ये हवा ये रात ये चांदनी”, “सीने में सुलाते है अरमां”, “शामे गम की कसम”, “जब छाये कभी सावन की घटा”, “जलते है जिसके लिये”, “राही मतवाले”, “रात ने क्या क्या ख्वाब दिखाये” अशासारखी किती गाणी सांगावी? द्वंद्व गीतात तर नायिका या हळव्या नायकाला हळूवारपणे सांभाळून घेत आहे असाच मला फिल येतो. जिज्ञासूनी त्यासाठी लता तलतचे सुहागनमधील “तुम्ही तो मेरी पुजा हो” हे गाणे जरूर ऐकावे.

तलतचा गायक म्हणून अस्त होण्याचे एक कारण त्याने अभिनय करण्याचा केलेला अट्टाहास असे दिले जाते. त्यात तथ्य असेलही. पण बदललेली सामाजिक परिस्थिती हे मला त्यामागचे महत्वाचे कारण वाटते. पण तरीही तलतच्या आवाजाची जादू आजही तिळभर कमी झालेली नाही. सासरी गेलेल्या मुलींची माहेरची ओढ कमी होते का? तेथे गेल्यावर त्यांचा पाय निघत नाही. तलतने आपल्या गाण्यांमधून ते सुंदर जुने जग आजही जिवंत ठेवले आहे. तलतच्या नायकाचा अस्त झाला असेल पण आजही तो आदर्श ठेवावासा वाटतो हेच त्या आवाजाचे यश आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment