कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आता सर्वच क्षेत्रात होऊ लागल्याने आमचं मानसोपचार हे क्षेत्रही त्याला अपवाद नसणारच. अलिकडेच समुपदेशनासाठी जे चॅट ऍप वापरले जाते ते पाहिले. मला नैराश्य आहे असे सांगून त्या ऍपसोबत अगदी थोडावेळच संवाद करण्याचा प्रयत्न केला. एकंदर प्रकार मला झेपला नाही. कदाचित हा माझ्या वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग असेल पण मला समोर हाडामांसाचा माणुस असल्याशिवाय संवाद साधताच येत नाही. मी फ्रि प्लानवर होतो. त्यामुळे पैसे भरल्यावर जास्त सोयी असतील हे मला माहित होते. पण जास्तीत जास्त काय असेल? तर अगदी तुम्हाला प्रत्यक्ष माणसाशी संवाद झाला असे वाटावे अशा तऱ्हेचे वातावरण तयार केलेले असेल. AI म्हणजे माणसाचा आभासच असतो. पण तो आभासच. प्रत्यक्ष माणुस नाही. या टप्प्यावर त्याबद्दल फार काही बोलता येणार नाही कारण मानसोपचार आणि AI क्षेत्राने अजून बराच पल्ला गाठायचा आहे. पण पुढे काय होईल याचा अंदाज बांधता येईल.
मानसोपचारातील निरनिराळ्या पद्धती वापरण्यात AI वाकबगार असेल. तुम्हाला CBT हवंय की REBT की DBT की ACT की सर्वसमावेशक पद्धतीचा वापर हवा आहे? तुम्हाला आज कुठल्या समस्येवर काम करायचं आहे हे विचारलं जाईल. AI चा प्रतिसाद अतिशय सकारात्मक असेल. वापरले जाणारे शब्द हे तुमचा उत्साह वाढवणारे असतील. पैसे भरल्यास तुमच्याशी AI तुमच्या भाषेत संवाद करु शकेल. बहुधा अतिशय देखणी व्यक्ती तुमची समुपदेशक असेल. किंबहूना शंभर देखणे फोटो तुम्हाला दाखवले जातील त्यातून तुम्हाला आवडलेली व्यक्ती तुम्हाला समुपदेशक म्हणून निवडता येईल. तिने कुठला वेष परीधान करावा हे देखील कदाचित तुम्ही ठरवाल. तुमच्या कानाला गोड वाटणारा आवाज तुम्हाला निवडता येईल. हे सारं ठिक आहे. पण तुमची त्यावेळची मनःस्थिती जाणून घ्यायला नुसते शब्दच नाहीत तर तुमच्या देहबोलीचा अभ्यास अत्यावश्यक असतो असे मला वाटते ते AI ला कसे समजणार? मात्र मला पडलेला प्रश्न याहूनही वेगळा आहे.
आज अनेक वर्षे माणुस समाजमाध्यमात आहे आणि इंतरनेटचा वापर करत आहे. प्रत्यक्ष माणुस समोर दिसत नसताना, त्याच्याशी संवाद होत नसताना, पलिकडे स्त्री आहे की पुरुष हे देखील माहित नसताना आपले हजारो जरी मित्र आंतरजालावर असले तरी त्याची त्यामुळे माणसाची भूक भागत नाही हे आता अनेकांच्या लक्षात येऊ लागले आहे.त्यामुळे अनेक मानसिक समस्याही उद्भवत आहेत. समाजमाध्यमात अनेक वर्षे संवाद साधणाऱ्या माणसांना नंतर एकमेकांना प्रत्यक्ष भेटण्याची ओढ लागते. माणसाला जेव्हा प्रत्यक्ष माणसाशीच संवाद करुन समाधान मिळणार असेल तर तेथे AI चा उपयोग काय असणार? एका ठिकाणी AI चा मागोवा घेताना एक विधान असे केले गेले की काही कालाने माणसे कृत्रिम गोष्टींना कंटाळतील आणि मग मॅनमेड गोष्टींची चलती सुरु होईल. हे खरं तर नवं नाही. आजदेखील हस्तकलेची चलती आहेच.
ह्युमन टच ही मला समुपदेशनातील अत्यंत महत्वाची गोष्ट वाटते जिची पूर्तता AI ने दिलेल्या कुठल्याही सोयीने होईल असे आजतरी मला दिसत नाही. माणसाला समाजप्रिय प्राणी म्हटले जाते. ज्यांना जबरदस्तीने एकटे राहावे लागते त्यांना मानसिक समस्या निर्माण होताना दिसतात. किंबहूना समाजात वावरण्याचा हक्क नसणे हेच सुधारलेल्या आजच्या जगात शिक्षेचे स्वरुप आहे म्हणूनच सर्व देशांमध्ये गुन्हेगारांना तुरुंगात पाठवले जाते. असे असताना माणसाने माणसाला समजून घेणे आणि त्यावर दोघांनी मिळून उपाय शोधणे हा जो समुपदेशनाचा गाभा आहे नेमका तोच AI मध्ये गायब झालेला आहे. बाकी सारे असले तरी जे हवे तेच नाही.याचा अर्थ हे तंत्रज्ञान निरुपयोगी आहे असा नाही. माणसाची आवश्यकता लक्षात घेऊन वैज्ञानिक शोधाला एका फटक्यात रद्दबादल करण्याची माझी भूमिकाच नाही. AI हे मानसोपचारातील नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरु शकेल.
नवनवीन शोध, मानसोपचर पद्धती यांची माहिती, माणसाच्या भाषेचे आकलन, त्या भाषेचे मानसोपचाराच्या दृष्टीने विश्लेषण याला AI चे प्रचंड सहाय्य होऊ शकते. समाजमाध्यमातील प्रचंड डाटा समोर असल्यावर त्याचे भावनिक अंगाने कमीत कमी वेळात विश्लेषण करणे हे AI ला शक्य आहे. त्यावरुन एकंदर चर्चेचा कल लक्षात येऊ शकतो. त्याच्याही मर्यादा असतील. पण तरीही तेथे AI वापरता येईल. AI ला डोक्यावर स्वार होऊ देऊन त्याच्या आहारी जायचे की त्याची बलस्थाने लक्षात घेऊन त्याचा वापर स्वतःसाठी करून घ्यायचा याचे भान निदान मानसोपचारांच्या बाबतीत असायला हवे असे मला वाटते. मानसोपचारासाठी चॅटबॉटचा वापर करणे ही वैयक्तिक आवड असू शकेल पण ह्युमन टच ला मानसोपचारांमध्येतरी पर्याय नाही अशी माझी समजूत आहे.
अतुल ठाकुर