मयसभेच्या पायरीवर तो उंचापुरा, बलदंड राजपुरुष उभा होता. आजुबाजुला सेवक प्रणाम करून जात होते. पण त्याचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते. तो आपल्याच विचारांमध्ये व्यग्र होता. प्रतिपक्षाने काही वर्षातच प्रचंड प्रगती केली होती. राजसूय यज्ञ केला होता. ती आपलीच भावंड असली तरी पुढे केव्हातरी त्यांचा आपल्याशी संघर्ष होणार हे त्याला कळून चुकले होते. त्याने गदा हातात पेलली. ती हातात असली की कसलेच भय नव्हते. जगात कुणीही गदायुद्धात त्याला हरवू शकणार नव्हते. हे सारं वैभव मूळात आपलं आहे हा नेहेमीचा विचार त्याच्या मनात आला. आपला पिता अंध निपजला त्यात आपला काय दोष? असे विचार करीत असतानाच त्याने मय सभेत प्रवेश केला आणि थाडकन त्याचे मस्तक भिंतीवर आदळले. गदा त्याच्या हातून निसटून खाली पडली. क्षणभर त्याला काही कळेचना. प्रवेशद्वार तर समोर दिसत होते. त्याने हळूच हात पुढे केला. हाताला अत्यंत मुलायम अशा गुळगुळीत, पारदर्शक स्फटिकाचा स्पर्श झाला. त्याला ह्सु आले. मयसभेतल्या या दृष्टीभ्रमांबद्दल त्याने बरेच ऐकले होते. मयसभा निर्माण करणार्या कलावंताचे त्याला मनोमन कौतूक वाटले. निव्वळ नेत्राच्या हालचालीने शत्रूच्या गदेचा प्रहार कुठे होणार हे ओळखणारे आपण स्फटिकाचे द्वार ओळखू शकलो नाही. तो पुन्हा हसला. गदा बाजुला ठेवून त्याने द्वार शोधण्यास सुरुवात केली.
सर्वप्रथम त्याने स्फटिकावर आपला हात ठेवला आणि तो डावीकडे फिरवू लागला. अजूनही स्फटिकच लागत होता. त्यानंतर त्याने उजवीकडे चाचपण्यास सुरुवात केली आणि एका ठिकाणी हात एकदम आत गेला. त्याला पुन्हा आश्चर्य वाटले. वेलबुट्टी काढलेल्या भिंतीचा भाग म्हणजे प्रवेशद्वार होते. समोरुन येणारा सेवक मात्र अगदी सवयीचे असल्याप्रमाणे त्याला प्रणाम करून भिंतीतून आरपार निघून गेला. त्याने थबकून एक पाऊल आत टाकले. आणि हळूच दुसरे पाऊल आत टाकले. मयसभेत त्याने प्रवेश केला. गदा बाहेर राहिल्याचे त्याला लक्षात आले. पण पुन्हा जाऊन गदा घेण्यापेक्षा परतताना घेऊ असा विचार त्याने केला. त्याची गदा सर्वसामान्य योद्ध्यांना पेलवणारी नव्हती. त्याने समोर पाहताच क्षणभर त्याचा स्वतःच्याच डोळ्यांवर विश्वास बसेना.समोरचे विस्तीर्ण सभागृह पाण्याने भरले होते. पाणी पाऊलभरच होते. त्यातच बसण्यासाठी आसने मांडली होती पण त्या आसनांचे पाय त्या उथळ पाण्यात बुडाले होते. त्याला काही कळेचना. पाण्यात सभागृह? पुढे पाऊन टाकताना त्याने आपले वस्त्र भिजू नये म्हणून किंचित वर उचलून धरले आणि नवलच! पाण्याच्या जागी गुळगुळीत स्फटीक होता. त्या विशिष्ट स्फटिकामुळे पाण्याचा भास निर्माण झाला होता.
पुन्हा मनोमन कलाकाराचे कौतुक करीत त्याने सावधपणे पाऊल पुढे टाकले. येथे पाणी नाही हे माहित असूनदेखील तो भासच इतका खरा होता की शरीराकडून ती कृती आपोआपच होत होती. सभागृह अतीविस्तीर्ण होते. त्याची शोभा पाहात पुढे जात असताना तो पुन्हा आपल्या विचारांमध्ये व्यग्र झाला. त्याच्या अंध, दुबळ्या पित्याने राज्याचा हा भाग त्याच्या बांधवांना दिला होता आणि अल्प काळातच ते सामर्थ्यवान झाले होते. शत्रू आपले सामर्थ्य वाढवत नेणार याबद्दल त्याच्या मनात शंका नव्हती. त्याआधीच हल्ला करणे भाग होते. हाती गदा असल्यावर त्याच्यासमोर कुणीही टिकाव धरु शकणार नव्हते. अगदी शत्रूपक्षाचे ते पाच योद्धेसुद्धा. शिवाय त्याच्या पक्षात फार मोठी माणसे होती. कवचकुंडले लाभलेला त्याच्यासाठी प्राण देण्यास तयार असलेला जिवलग मित्र होता. शत्रूपक्षालाही ज्यांनी शस्त्रविद्या शिकवली असा महापराक्रमी गुरु त्याच्या बाजूने होता. इच्छामरणाचा वर लाभलेला, ज्याचा आजवर कुणीही पराभव करु शकले नव्हते असा त्याचा पितामह त्याच्या पक्षात होता. त्याचा जय निश्चित होता. अशावेळी जुगारासारख्या क्षुद्र गोष्टींचा आश्रय घेण्यास त्याचे मन तयार नव्हते. फासे फेकून मिळालेला जय त्याला नको होता. आणि त्यामुळे त्या पराक्रमी योद्ध्याला समाधानही लाभणार नव्हते. बलदंड शत्रूला नमवायचे ते रणांगणातच आणि तेही आपल्या गदेच्या प्रहारानेच. तो अचानक थबकला. त्याची विचारशृंखला तुटली. समोर दुसर्या दालनात जाण्यासाठी उघडलेले द्वार होते. मात्र आता तो फसणार नव्हता.
त्याने हळूच हात पुढे केला. हात सहजपणे आत गेला. मग त्याने पहिले पाऊल टाकले. हे खरोखरच द्वार होते. तो आत प्रवेशला आणि त्याचे भानच हरपले. दालनाच्या भित्तिकेवर निरनिराळ्या रंगात वेलबुट्ट्या काढून चित्रं रंगवली होती. आणि ती तशीच समोर भूमीवरही चितारली होती. त्यामुळे भित्तिका कुठे संपते आणि भूमी कुठे सुरु होते लगेच कळत नव्हते. हा आणखी एक दृष्टीभ्रम. उजवीकडून एक सोपान वर जात होता. त्याने पाहिले आणि तो थबकला. त्या सोपानावर सेविकांसमवेत ती उभी होती. शत्रूपक्षाची स्त्री. पाचांची पत्नी. अनुपम सौंदर्याचे वरदान लाभलेली. ती ही त्याच्याचकडे पाहात होती. तिला पाहताच त्याला आठवला तो आपला मित्र. या उद्धट, अहंकारी स्त्रीने स्वयंवरात त्याच्या जिवलग मित्राचा अपमान केला होता. “सूतपुत्राला वरणार नाही” तिचे वाक्य त्याच्या हृदयात कळ उमटवून गेले. त्याने विचार केला शत्रूला नमवले की हा अहंकारही आपोआपच ठेचला जाईल. मित्राचा अपमान त्याच्या मनातून जाईना. आणि त्या विचारातच त्याने अभावितपणे पाऊल पुढे टाकले मात्र आणि तो थेट जलाशयात कोसळला. तेथे जलाशयाच्या जागी भूमीचा भास निर्माण केला गेला होता. कोसळताना त्याने गदेच्या आधाराने स्वतःला सावरले असते पण गदा तर बाहेरच राहिली होती. त्याची वस्त्रे भिजून गेली. त्याचा मुकूट कुठेतरी पाण्यातच नाहीसा झाला. तो स्वतःला कसाबसा सावरत असतानाच त्याला तिच्या हसण्याचा आवाज आला आणि तप्त लोहशलाकेप्रमाणे तिचे शब्द त्याच्या कानात शिरले “आंधळ्याचा पूत्रही आंधळाच”…
संतापाने त्याचे शरीर थरथरु लागले. नागिणीने दंश केल्याप्रमाणे मानहानीचे विष त्याच्या शरीरात भिनू लागले. त्याला आपल्या अंध पित्याचा अपमान सहन होईना. आंधळ्या मायेने पित्याने नेहेमी त्याची बाजू लावून धरली होती. पण त्याला शत्रूपक्षाबद्दल सहानुभूती बाळगणार्या मंत्र्यांमुळे मर्यादा पडल्या होत्या. त्याच पित्याने यांना हे राज्य विभागून दिले आणि त्याचाच अंध म्हणून उपहास केला जात होता. आपल्यासाठी प्राण पणाला लावायला तयार असलेल्या मित्राचा हिने अपमान केला होता. आणि आता आपला… हिच्या पाच पतींमधला एक तरी आपल्या गदेसमोर टिकेल काय? त्याला आता मुकूट शोधावासा वाटेना. तो तसाच मागे फिरला. आणखी दृष्टीभ्रम पाहण्यात त्याला आता रस नव्हता. त्याचे नेत्र लालबूंद झाले होते. मुठी आवळल्या गेल्या होत्या. परतताना कसलाही दृष्टीभ्रम नव्हता. कुठे काय आहे ते त्याला ठावूक होते. आता फक्त शत्रूचा पराभव करायचा. जूगार तर जूगार, द्युत तर द्युत. खरोखर कोण अंध आहे हे दाखवून द्यायचं. ओली वस्त्रे असलेला मुकूटरहित असा तो योद्धा मयसभेच्या बाहेर आला. बाजूलाच त्याला आपली गदा दिसली. इतरांना जड वाटणारी ती गदा त्याने सहजपणे हातात पेलली. ती हातात असली की कसलेच भय नव्हते.
अतुल ठाकुर