सत्तेचं सामर्थ्य हाताशी असलं आणि एका अर्थाने absolute Power आपल्याकडे असेल तर व्यक्ती धोकादायक होते हे अनेकदा सार्वजनिक जीवनात दिसून आलं आहे. सत्ता आणि प्रांजळपणा, सचोटी, नम्रता यांचं जणू वैरच असावं. “फ्यु गुड मेन” या चित्रपटात जॅक निकलसनने साकारलेला कर्नल जेसप हे अशा व्यक्तीचे उत्तम उदाहरण. कर्नल जेसप हा करडा सेनानी त्याच्या हाताखालील सैनिकाकडून आगळीक होते म्हणून त्याला इतर दोघांकडून “कोड रेड” ची शिक्षा देववतो. ही शिक्षा म्हणजे हत्याच असते. मात्र त्याला काही त्यात चुकीचं वाटतच नाही. त्याच्या शेवटच्या भाषणात ते प्रखरपणे अधोरेखित होतं. पण त्याच्या आधीही बरंच काही घडतं ज्यात कर्नलचा अनिर्बंध सत्तेत मुरलेला स्वभाव दिसून येतो. एका प्रसंगी त्याच्याकडे कागदपत्र मागायला गेलेल्या टॉम क्रूझला कर्नल” यु हॅव टू आस्क मी नाईसली” म्हणून खडसावतो.
म्हणजे तुम्ही असाल लॉयर तर आपल्या घरचे. येथील अनभिषिक्त सम्राट मी आहे. तेव्हा माझ्याशी वागताना तुम्ही आदर दाखवायला हवा असं स्पष्टपणे सांगायला हा माणुस कचरत नाही. इथपर्यंत सर्व ठीक आहे. मात्र येथे एक वेगळाच संघर्ष आहे. अनेकांच्या भल्यासाठी काहींचा बळी द्यायला हरकत नाही या तत्वज्ञानाचा एक पदर येथे आहे. असा बळी देणे हे योग्यच आहे, नैतिक आहे शिवाय ती देशसेवा आहे असा एक दुसरा पदर देखील या चित्रपटात आहे. ध्येय योग्य असले तर मार्ग कुठलेही अंगिकारले तरी हरकत नाही. साधनशूचिता ही महत्वाची नाही, ध्येय महत्वाचे आहे या गोष्टी कर्नलच्या वागण्यातून अधोरेखित होत जातात. हा कर्नल भ्रष्ट नाही ही आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट येथे लक्षात घ्यावी लागेल. त्याला मेडल नको, त्याला प्रसिद्धी नको त्याला काहीही नको. त्याच्या देशप्रेमावर शंका घेता येणार नाही. पण इतकं पुरेसं असतं का हा प्रश्न आहे.
हा कर्नल भ्रष्ट नसणे ही बाब आपल्याकडील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मला महत्वाची वाटते. आपल्याकडे बहुतेकवेळा स्वार्थ ही प्राथमिकता असते. त्यानंतर बाकी सारे. इथे स्वार्थ नाही. देशप्रेम कशाला म्हणायचे? देशप्रेम की दया, करुणा, मानवता असा इथे प्रश्न आहे. कर्नलचा स्वभाव पाहता दुबळ्या सैनिकाची हत्या ही अतिशय अयोग्य आणि निषेधार्ह असली तरी कर्नलच्या वागण्यात एक तार्किक संगती दिसते. अधिकाराच्या पदावर उच्चासनी बसलेली काही माणसे नाकावर माशी बसू देत नाहीत. We are in the business of saving lives असे त्याचे स्वच्छ सांगणे आहे. हा नो नॉनसेन्स माणुस कोर्टात जबाब देताना मात्र घसरतो आणि तिथे त्याच्या मुखवट्यामागचा खरा चेहरा दिसू लागतो.
दे दृष्य मूळ चित्रपटातच पाहण्याजोगे. जॅक निकलसनच्या अभिनयाने अवाक व्हायला होते इतकेच इथे म्हणतो कारण लेखाचा विषय वेगळा आहे. कोर्टात कर्नल जे बोलतो त्यावरुन त्याचे म्हणणे असे दिसते की त्याच्यासारखी माणसे देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत म्हणून सारे काही आलबेल चालले आहे. असे असताना त्याचा त्याच्या कृतीला जबाबदार धरलेच कसे जाते? जर त्याने एखाद्या माणसाची देशहितासाठी हत्या केली असेल तर ते योग्यच आहे आणि पुन्हा असा प्रसंग आला तर पुन्हा तो असेच वागेल. खरं तर सर्वांनी त्याचे आभार मानायला हवेत. तो म्हणतो, ” जो गेला त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याची मुभा तुम्हाला आहे पण त्याच्या जाण्याने अनेकांचे प्राण वाचले.” पुढे अत्यंत गुर्मीत तो उत्तर देतो की मी माझं कर्तव्य केलं आणि यापुढे पुन्हा ही करेन. आपल्या हातून काही आगळीक घडली आहे असं त्याला वाटतंच नाही. आणि हे भीषण आहे अशी माझी समजूत आहे.
स्वतःच्या मतांबद्दल कडवा अभिमान असलेली आणि त्याबद्दल निःशंक असलेली माणसे कशी असहिष्णू होऊ शकतात हे कर्नल जेसपच्या वागण्यातून दिसून येते. मारला गेलेला सैनिक देशबंधूच आहे. दुबळा आहे. त्याला त्याच्या सोबतच्या सैनिकांकडूनच कर्नल मारवतो. हे प्रकरण वेगळ्या तऱ्हेने हाताळता आले असते. जीव घेण्याऐवजी इतरही कायदेशीर मार्ग होते. मात्र येथे देशप्रेमासोबत सत्तेचा कैफ, अहंकार आणि त्यामुळे आलेला निष्ठूरपणा असा ज्याला डेडली म्हणता येईल असा कर्नलचा स्वभाव बनला होता. ज्यातून एका दुबळ्या, त्याच्या अपेक्षेला न उतरणाऱ्या सैनिकाची हत्या झाली. कर्नल जेसपच्या देशभक्तीबद्दल प्रश्नच नाही. पण तुम्ही देशभक्त आहात म्हणजे तुम्हाला हवं तसं वागण्याचा परवाना मिळाला का? हा खरा प्रश्न आहे.
अतुल ठाकुर