अकिरा कुरोसोवाचा युजिंबो पाहायला मिळाला नाही. मात्र त्यावर बेतलेले चित्रपट अनेकवेळा पाहिले. त्यातला एक चित्रपट म्हणजे सर्जियो लियॉनोचा इतिहास घडवणारा क्लिंट इस्टवूड अभिनित “फिस्टफूल ओफ डॉलर्स”. पुढे ओळीने “फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर” आणि “द गुड, द बॅड अँड द अग्ली” हे सर्जिओचे आणखि दोन चित्रपट आले. आज वेस्टर्न पटात या तीन क्लासिक गणलेल्या चित्रपटांना डावलून पुढे जाताच येणार नाही.
युजिंबोच्या कथानकावर बेतलेला दुसरा चित्रपट वॉल्टर हिलचा “द लास्ट मॅन स्टँडिंग” १९९६ साली आला. या दोन्ही चित्रपटांचे साधारण कथानक म्हणजे निष्णात गन फायटर प्रवासात मध्ये लागलेल्या आडगावात थांबतो. तेथे दोन विरुद्ध टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई चाललेली असते. दोन्हीकडून पैसे उकळावे या इराद्याने हा धूर्त माणूस डबलगेम दोन्ही टोळ्यांना नाचवतो. मात्र या माणसाचा एल वीक पॉईंट असतो. तो म्हणजे स्त्रियांबद्दल सहानुभूती. एका टोळीच्या म्होरक्याने धरून ठेवलेल्या स्त्रीला सोडविण्यासाठी हा आपल्या स्वार्थावर पाणी सोडतो. आणि पुढे काय घडते ते प्रत्यक्ष पाहण्याजोगेच.
कथानक सारखेच असले तरी वॉल्टर हिलचा चित्रपट नुसताच अलिकडला नाही तर चित्रपटातील कालखंडदेखिल अलिकडला आहे. त्यात गाड्या आहेत. कोट्स आणि हॅट्स घालणारे गनफायटर्स आहेत. वॉल्टर हिलने नायकाच्या भूमिकेसाठी ब्रूस विलिसला घेऊन मास्टरस्ट्रोक मारला आहे असे म्हणावेसे वाटते. सोल्जर कट ठेवलेला ब्रूस विलिस त्या काळ्या ब्राऊन कोट आणि हॅटमध्ये शोभून दिसतो. हा चित्रपट मला विशेषकरून दिग्दर्शनासाठी पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.
संपूर्ण चित्रपट सेपिया टोनमध्ये रंगवला आहे. त्यामुळे आपोआपच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाचा फिल येतो. सतत धूळीने भरलेले, गुंडगिरीमुळे जवळपास निर्मनुष्य झालेले गाव अंगावर येते. मध्येच मेलेल्या घोड्याचा सांगाडा पडलेला दाखवला आहे. कुणालाच कसली फिकिर नसते. गावातील बेरकी मार्शल तर कसलिच जबाबदारी घ्यायला तयार नसतो. या भूमिकेसाठी जुना कसलेला अभिनेता ब्रूस डर्नची चपखल निवड केली आहे.
काही जण पडद्यावर आले की अभिनयाच्या मेजवानीची खात्री वाटते. ब्रूस डर्न त्याच्याकडे कारला गुंडांनी नुकसान पोहोचवल्याची तक्रार घेऊम आलेल्या ब्रूस विलिसला उलट्या पावली परत पाठवतो. या गावात “यु आर ऑन युवर ओन” हे त्याचे शब्द असतात. आणि सल्ला म्हणजे येथे थांबायचं असेल तर “गेट अ फायर आर्म”.
विल्यम सॅडर्सन या गुणी अभिनेत्याला गावात हट्टाने राहिलेल्या सलून मालकाची भूमिका दिली आहे. हा भाबडा माणुस शेवटपर्यंत नायकाच्या बाजूने उभा राहतो. आपल्याकडे खलनायक प्राणचे नाव शेवटी यावे त्याचप्रमाणे यात अॅड ख्रिस्तोफर वॉकन…असे म्हणावेसे वाटते. त्याने रंगवलेला हिकी हा पुरेसा क्रूर आणि भीतीदायक वाटतो.
ब्रूस विलिसची पहिलीच गनफाईट धक्कादायक आहे. कारण असे काही होईल असे प्रेक्षकाच्या गावीही नसते. या गनफाईटचे चित्रिकरण, संकलन सारे काही अभ्यासण्याजोगे. मध्येच विद्युतवेगाने झालेल्या हालचाली तर अचानक स्लोमोशन असा आधार घेऊन हे दृश्य अतिशय परिणामकारक झाले आहे. अशा तर्हेच्या चित्रपटांमध्ये हिंसाचार असतोच. मात्र ब्रूस विलीसच्या गन हाताळण्याच्या कौशल्यामुळे ती दृश्ये खरी वाटतात.
एका नायकाशी कसलाही संबंध नसलेल्या अबलेमुळे झालेले रामायण हे युजिंबोचे मध्यवर्ती कथानक असावे. पण त्याला नंतरच्या दिग्दर्शकांनी दिलेली “ट्रिटमेंट” पाहणे मनोरंजक वाटते. शेवटी असे वाटते की हे कथानक आपल्या सर्वांचे आहे.
काही मतं, काही तत्त्वं आपण प्रत्येकजण बाळगत असतो. आयुष्याच्या एका टप्प्यावर कस लागतो. निवड करण्याची वेळ येते. त्यासाठी किंमत चुकवताना माणसाची कुठवर जाण्याची तयारी असते यावर सारे काही अवलंबून असते. मात्र निवड ही करावीच लागते. चित्रपटाची सुरुवातच मुळी या वाक्याने होते…It’s a funny thing. No matter how low you sink…there’s still a right and a wrong…and you always end up choosing. You go one way so you can try to live with yourself. You can go the other and still be walking around…but you’re dead and you don’t know it.
अतुल ठाकुर