पुण्याला जाताना शिवाजीनगर येण्याअगोदर फोन आला. फोनवर यशोदा वाकणकर होत्या. “माझे आजचे महत्त्वाचे काम रद्द झाले आहे, आपण भेटुया का?” हे सारंच मला नवीन होतं. माझ्यासारखा संशोधनासाठी मुक्तांगण येजा करणारा सामान्य माणुस. मी अनुबंधच्या वेबसाईटवर यशोदाताईंच्या संवेदना एपिलेप्सी ग्रुपची माहीती टाकली. आणि काही दिवसांपुर्वी त्यांनी मला भेटण्याची इच्छा मेलवर व्यक्त केली होती. दिवस आणि वेळ ठरला. पण अचानक त्यांना काहीतरी महत्त्वाचं काम निघालं आणि भेट रद्द झाली. मला मुक्तांगणला जायचं होतंच पण या भेटीची उत्सुकता देखिल फार होती. ती रद्द झाल्याने मनातुन खट्टु झालो होतो. पण शिवाजीनगर येण्याच्या काही मिनिटे अगोदर यशोदाताईंचा फोन आला आणि सारं मळभ दुर झाल्यासारखं वाटलं. त्यांना भेटण्यासाठी शिवाजीनगरला उतरलो. यशोदाताईंबद्दल शोभनाताई आणि सई या माझ्या आप्त मंडळींनी जी माहिती दिली होती ती “मोठी माणसं” या कॅटेगरीशी जुळणारी नव्हती. दुर्दैवाने माझा तथाकथित “मोठ्या माणसांचा” अनुभव फारसा चांगला नसल्याने मी स्वतःहुन धावतपळत त्या दिशेला संधी असली तरीही जाणं टाळतो. आपल्या मनातली प्रतिमा चांगली आहे ती तशीच राहु देत अशा विचाराने. पण यशोदाताईंना भेटायचंच होतं. त्यांचा मृदु स्वभाव, त्यांचं गाणं, त्यांनी एकहाती सुरु केलेला एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप, त्यासाठी त्या परदेशात असतानादेखिल तेथुन त्यांनी चालवलेली धडपड या सार्या गोष्टी मला माहित होत्या. अनिल अवचटांच्या पुस्तकातुन लहानपणापासुन वाचलेली “यशो” ही प्रतिमादेखिल कुठेतरी निरागस आणि निर्व्याजपणाशीच जुळणारी होती. आणि त्यांच्या या निरागसपणाचा अनुभव मला त्यांना भेटण्याआधीच आला होता. ही आतुनबाहेरुन स्वच्छ असलेली माणसं मनातलं स्पष्टपणे बोलुनही टाकतात. सुरुवातीला मला “संवेदना” बद्दल फारशी माहिती मिळत नव्हती. मला यशोदाताईंच्या समस्यांची तेव्हा कल्पना नव्हती. त्यामुळे मी याबद्दल आमच्या काही कॉमन मित्रांमध्ये माझी भावना बोलुन दाखवली. त्यावेळी यशोदाताईंशी फोनवर पहिल्यांदा बोलणे झाले आणि त्यांनी फोनवर मला अक्षरशः झापलेच. पण त्याच संभाषणात आमच्यातले गैरसमज दुरही झाले. यशोदाताईंनी “झालेला गैरसमज आता विसरुन जाऊयात” असे सांगुन पुढचे बोलणे सुरुदेखिल केले.
शिवाजीनगरला उतरुन थोडे पुढे जाऊन थांबलो. यशोदाताईंना यायला थोडा वेळ होता. ज्या सपोर्ट्ग्रुपबद्दल माहिती हवी असते तो सपोर्टग्रुप ज्या क्षेत्रात किंवा आजारासंदर्भात काम करत असेल त्याची आपल्याला माहिती असतेच असे नाही. मात्र एपिलेप्सी ही गोष्ट मला नवीन नव्हती. आमच्या शेजारी एक कुटूंब राहात असे. त्यात बहिणी, आई आणि एकमेव भाऊ होता ज्याला हा आजार होता. आर्थिक बाबतीत कसलिही समस्या नसलेले हे कुटुंब आपल्या भावाच्या आजारामुळे सतत चिंतेत राहात असे. या मंडळींना भावनिक आधार देण्याचे आणि आवश्यकता असेल तेथे स्वतः हजर राहुन जातीने त्या भावाला सांभाळण्याचे काम आमच्या कुटुंबाने अनेक वर्षे केले होते. त्यामुळे हा आजार जवळुन माहित होता. त्यामुळे येणारी अगतिकता पाहिली होती, अनुभवली होती. या भावाला कुठल्याही क्षणी एपिलेप्सीचा अॅटॅक येत असे. त्यावेळी त्याचा स्वतःवरचा ताबा नाहीसा होत असे. काही मिनिटांनी भानावर आल्यावर काहीवेळा त्याला आजचा दिवस, वेळही पटकन लक्षात येत नसे. मुंबईच्या लोकल प्रवासात कामावर येता जाताना गाडीत असे झाल्यास काय होणार हा घोर त्या घराला सतत लागलेला होता. शेवटी त्या भावाला आपली नोकरी सोडुन द्यावी लागली. यशोदाताईंना हा आजार लहानपणापासुन होता आणि त्यांचे ऑपरेशन होऊन तो कायमचा बरा झाला होता हे जेव्हा मला कळले तेव्हा या आजारावर शस्त्रक्रियाही उपलब्ध आहे ही माहिती मला झाली. पुन्हा फोन आला. यशोदाताई सांगीतलेल्या वेळेआधीच आल्या होत्या. मी थोडा पुढे आलो होतो आणि त्या स्टेशनकडे गेल्या होत्या. मी कुठे उभा आहे ते त्यांना सांगीतले आणि त्यांची वाट पाहु लागलो. काही क्षणातच त्या हसतमुखाने पुढे येताना दिसल्या. “इथे एक भेळवाला आहे. त्याचा हात कसल्याशा आजाराने सतत हलत असतो आणि त्या हाताने तो भेळ बनवतो. अतिशय चविष्ट असते त्याची भेळ आणि खुप प्रसिद्ध आहे. मला खुप आवडते” हे यशोदाताईंचे एंट्रीचे वाक्य होते. मी सपशेल फ्लॅट झालो. विद्यापिठात कर्तृत्ववान, विद्वान मंडळी पाहण्याचा योग नेहेमीच येतो. दुसर्याला तुच्छ लेखणे ही विद्वत्तेची प्राथमिक अट तत्परतेने पाळणारी ही माणसे पाहण्याची सवय असलेल्या मला भेळेची आवड असलेल्या यशोदाताई अगदी वेगळ्या वाटल्या आणि पहिल्या भेटीतच आवडुन गेल्या.
बाजुच्या हॉटेलमध्ये बसुन आमचे बोलणे सुरु झाले. “आपल्याकडे काही आजारांना प्रतिष्ठा आहे” यशोदाताईंनी फार वेगळ्या मुद्द्याने सुरुवात केली होती.” माणसाला हृदयविकार असेल, डायबेटीस असेल तर माणुस लपवत नाही. काही जण तर अगदी कौतुकानेदेखिल या आजारांचा उल्लेख करतात. पण आपल्याला टीबी झालाय असं कुणीही सांगत फिरत नाही. तसंच एपिलेप्सीचं देखिल आहे. फिट येणार्या या आजाराबद्दल समाजात प्रचंड गैरसमज आहेत. हा आजार शक्यतो लपवण्याकडेच लोकांचा कल असतो. त्यामुळे पुढे सामाजिक दृष्ट्या गुंतागुंत खुपच वाढते. सपोर्टग्रुप सुरु करण्याचं महत्त्वाचं कारण या आजाराबद्दल असणारे गैरसमज दुर करणं हे आहे. वीसपंचवीस वर्षापुर्वी या आजारावर फारशी औषधं उपलब्ध नव्हती. आता मात्र अनेक औषधे आणि शस्त्रक्रियेसारखा पर्यायही उपलब्ध आहे. याची कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना नसते. आपल्याकडे या आजाराबद्दल समाजात असलेली नकारात्मकता इतकी प्रचंड आहे कि काही काही हतबल आईवडील फक्त आपलं म्हणणं कुणीतरी ऐकुन घ्यावं म्हणुनही आमच्याकडे येतात” यशोदाताईंनी समाजामध्ये रुजलेल्या समजुती आणि त्यामुळे एपिलेप्सी रुग्णाची होणारी कोंडी याचं अत्यंत विदारक चित्र उभं केलं होतं. एपिलेप्सी आहे म्हणुन शाळेतुन मुलांना काढुन त्यांना घरी बसवणारे आई वडिल यशोदाताईंना माहित आहेत. त्याचप्रमाणे एपिलेप्सी आहे म्हणुन मुलांना शाळेतुन काढणार्या शाळांची उदाहरणे देखिल त्यांच्याकडे आहेत. कधीही फिट येऊ शकते याचा परिणाम माणसांच्या अवघ्या आयुष्यावर होऊन पुढे शिक्षणाशिवायच माणसे राहतात आणि वय निघुन जातं अशा घटना त्यांनी पाहिल्या आहेत. भारतीय समाजात या आजाराचा अतिशय वाईट परिणाम दिसत असेल तर लग्नाच्या बाबतीत. मुलगा काय किंवा मुलगी काय, हा आजार लपवुन लग्न केलं तर पुढे खुप त्रास दोन्हीकडच्या घरांना सहन करावा लागतो आणि संसार मोडण्याची वेळदेखिल येते. यासाठी यशोदाताईंच्या संवेदना ग्रुपने फक्त एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी विवाहमंडळ सुरु केले आहे. संवेदनाचा हा अतिशय महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा उपक्रम आहे. याला प्रचंड प्रतिसाददेखिल मिळाला आहे.
यशोदाताईंनी आपल्या बाबाच्या म्हणजे अनिल अवचटांच्या सल्ल्याने सुरुवातीची पावले टाकली. “जेव्हा ग्रुप सुरु करण्याचं ठरलं तेव्हा बाबा म्हणला यशो काही करशील तर आधी रजिस्ट्रेशन कर. विश्वासातली माणसं ट्रस्टी म्हणुन घे. मग पुढची वाटचाल कर. पहिल्या सभेला जेव्हा निमंत्रणं गेली, किती लोक येतील याची शंका होती. बाबा धीर देत म्हणला दोन जण जरी आले तरी ग्रुप घेता येतो. प्रत्यक्षात चाळीस जण आले. आणि संवेदनाचे काम सुरु झाले.” आज या सुरुवातीपासुन आलेल्या आणि अजुनही संवेदनामध्ये काम करणार्या लोकांच्या सहकार्याने संवेदनाची कोअर टीम बनली आहे. संवेदनाने आणि यशोदाताईंनी मग मागे वळुन पाहिलंच नाही. आता संवेदना कित्येक एपिलेप्सी ग्रुपसाठी आदर्श मॉडेल झाले आहे. निरनिराळ्या शहरातील माणसे एपिलेप्सीसाठी काम करताना, त्याबाबत सपोर्टग्रुप सुरु करताना संवेदनाकडे पाहतात. आणि संवेदनाची मंडळीदेखिल त्यांना शक्य तितकी मदत करतात. असे अनेक एपिलेप्सी सपोर्टग्रुप संवेदनाच्या सहकार्याने सुरु झाले आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित राहुन यशोदाताई आणि त्यांचे सहकारी या ग्रुप्सचा उत्साह वाढवण्याचे काम नेहेमी करीत असतात. संवेदना हा एनजिओ आहे आणि आमच्या समाजशास्त्रात विशिष्ट दृष्टीकोणाची काही माणसे या एनजिओ टाईपच्या संस्थांना नकारात्मकरित्या पाहात असतात. माझ्या मनातही शंका होतीच. देणग्यांच्या आधारावर संवेदानाचे काम चालले आहे असे सांगुन यशोदाताई म्हणाल्या कि इतकी वर्षे म्हणजे २००४ पासुन हा सपोर्टग्रुप कार्यरत असुन देखिल जेथे मिटींग चालते तेथे असलेले एकमेव कपाट एवढीच आमची प्रॉपर्टी आहे. दर महिन्याला मिटींग, किंवा समुपदेशन हे तर संवेदनामध्ये असतेच पण एपिलेप्सीचा रुग्णांना इतर आजारांचे ज्ञान व्हावे यावर यशोदाताइंचा कटाक्ष असतो. त्यामुळे संवेदनामध्ये फक्त एपिलेप्सीवरच आधारीत कार्यक्रम होतात असे नाही. आपला आजार, आपली दुखणी, कवटाळुन, कुरवाळुन फार मोठी वाटु लागतात, तेव्हा याहीपेक्षा जास्त वेदना आणि यातना सहन करणारी माणसे आहेत याची कल्पना बाकीच्या कार्यक्रमांमुळे येते. यशोदाताई बोलत असताना माझे लक्ष त्यांच्या हाताकडे गेले होते. त्यांचे ऑपरेशन होण्याआधी गॅससमोर त्यांना एपिलेप्सीचा अॅटॅक आला होता आणि त्यांचा हात पेटत्या बर्नरवर पडुन जबरदस्त भाजला होता. त्या खुणा त्यांच्या उजव्या हातावर होत्या. मात्र या वेदनेचा उपयोग संवेदनेच्या निर्मितीसाठी झाला होता.
आज यशोदा वाकणकर हे नाव संवेदनासाठी आणि एपिलेप्सीच्या कामासाठी सुप्रसिद्ध झाले आहे. मात्र हा प्रवास सोपा नव्हता आणि नाही. संवेदनासारखा सपोर्टग्रुप चालवणं हे खडतर काम आहे याची कल्पना यशोदाताईंच्या बोलण्यातुन आली. माणसे सतत एकच एक कार्यक्रम. मिटींग्ज यांना कंटाळतात. मग नवनवीन कार्यक्रम घेऊन त्यांचा उत्साह वाढवावा लागतो. त्यातुन यशोदाताईंचे पती कामानिमित्त परदेशात असतात. यशोदाताईदेखिल परदेशात जात येत असतात. त्यावेळी तेथे राहुन संवेदनेची सूत्रे त्यांना हलवावी लागतात. संसार आणि संवेदना या दोन्ही आघाड्यांवर त्यांना काम करावे लागते. सपोर्ट ग्रुपची माहिती मिळवत असताना मी असे पाहिले आहे कि काही माणसे आपल्या आजाराबाबत एवढी हळवी झालेली असतात की त्यांना बरे झाल्यावर त्या आजाराविषयी कुणी चकार शब्द काढलेला चालत नाही. येथे लहानपणापासुन अनेक वर्षे एपिलेप्सीच्या वेदना भोगुन बरी झालेली व्यक्ती माझ्या समोर बसली होती. आणि यशोदाताईंनी बरे झाल्यावर त्या कटु आठवणी विसरण्याऐवजी त्या वेदनांचा उपयोग समदु:खी माणसांची दु:खे दुर करण्यासाठी केला होता. या माणसांचे समुपदेशन करताना पुर्वीच्या आठवणी येऊन किंवा सतत त्यांची दु:खे पाहुन तुम्हाला त्रास होत नाही का? याप्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर फार महत्त्वाचे होते. यशोदाताईंनी मानसशास्त्रात पदवी घेतली होती. त्यानंतर आरएबीटीसारखी समुपदेशनपद्धती देखिल त्या शिकल्या होत्या. त्यांनी डॉ. आनंद नाडकर्णींनी दिलेले उदाहरण मला सांगीतले. रुग्ण आणि समुपदेशक हे दोन चौकोनांसारखे असतात. या दोन चौकोनांचा पंचवीस टक्के भाग उपचार करताना एकमेकांवर यावा अशी अपेक्षा असते. एवढी जवळीक, सहानुभुती ही समुपदेशन करताना रुग्णाबद्दल असायला हवी. मात्र रुग्णाबरोबर तुम्हीही रडायला लागलात तर तुम्ही त्याला मदत करु शकणार नाही. समुपदेशन झाल्यावर मी यशोदा असते. मला माझे आयुष्य आहे, संसार आहे, छंद आहे, सारे काही आहे. त्यामुळे आता त्रास होत नाही. यशोदाताई मोकळेपणाने बोलत होत्या. माझी निघण्याची वेळ झाली होती. बरेच प्रश्न विचारायचे होते. संवेदनासारख्या सपोर्टग्रुपचे काम हे आर्थिक फायदा करुन देणारे नाही. यात ग्लॅमरदेखिल नाही. समाजातील याबाबतच्या गैरसमजाचे कातळ अजुनही फोडायचे आहेत. काय दृष्टीकोण असेल यांचा हे काम करताना?
यशोदाताई हसुन म्हणाल्या “पुर्वीची माणसे विनोदाने कसलिही मिळकत नसलेल्या कामाला लष्कराच्या भाकर्या भाजण्याचे काम म्हणत तोच दृष्टीकोण समोर ठेऊन हे काम करायचे असते.” याउत्तरानंतर यावर काही विचारायचे त्यांनी शिल्लकच ठेवले नाही. अनासक्त राहुन, त्याविशिष्ट कामात झोकुन देण्याची इच्छा असणारी, आपल्यासारखेच दु:ख इतरांना भोगावे लागु नये अशी मनापासुन तळमळ असणारी यशोदाताईंसारखी माणसेच हे काम करु शकतात हे माझ्या लक्षात आले. कामातुन मिळणारे समाधान हीच त्यांची मिळकत असणार. रुग्णाच्या आणि त्याच्या नातेवाईंकांच्या चेहर्यावरचा आनंद हाच त्यांना उत्साह देत असणार. मनात विचार आला निष्काम कर्मयोगाबद्दल खुप ऐकलं होतं. येथे हे जिवंत उदाहरण पाहायला मिळालं. निघताना मला संवेदनाचे काम करायचे असेल तर मी स्वतः येऊन ते काम पाहिले पाहीजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या अफाट कामाचा फक्त काही भागच कळला होता. हिमनगाच्या खालचा भाग अजुनही दिसायचा राहीला होता. या भेटीत एक दुर्मिळ गोष्ट जाणवली. अलिकडे माणसांमध्ये न आढळणारा निर्व्याज निरागसपणा मला यशोदाताईंमध्ये दिसला होता. आमच्या संभाषणाच्या दरम्यान हे मला कळत नकळत जाणवत राहिले. असा निरागसपणा लहान मुलांमध्ये दिसतो. त्यामुळे त्यांच्याशी खोटं वागता येत नाही. अगदी बरोबरीच्या नात्याने त्या बोलत होत्या. स्वत्;हुन भेटण्याची अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी माझा फार मोठा सन्मान केला होता. कुठलाही प्रश्न त्यांनी टाळला नाही. त्यांच्या उत्तरात कुठेही “पोलिटीकली करेक्ट” असा प्रकार नव्हता. प्रश्नाला सरळ समोरुन भिडायचे आणि उत्तर द्यायचे ही त्यांची पद्धत होती. अंतर्बाह्य मोकळेपणा आणि पारदर्शकता जी आता अतिशय दुर्मिळ झाली आहे ती मला त्यांच्यात पाहायला मिळाली. अशा निरागसतेत फार मोठी ताकद असते. अशा माणसांसमोर तर्क वितर्क, कुतर्क चालत नाहीत. आपला शहाणपणा चालवता येत नाही कारण त्या निरागसतेच्या पावित्र्यात आपले शहाणपण वाहुन जाते. आणि आपण नतमस्तक होतो. यशोदाताईंशी बोलताना मला हाच अनुभव आला.