लता आणि खय्याम एकत्र आल्यावर चमत्कार घडतो असा अनुभव आहे. अगदी “रजिया सुल्तान” पर्यंत हा चमत्कारांचा पुराना सिलसिला सुरु राहिला होता. १९७९ साली आलेल्या “खानदान” चित्रपटाची कुणाला आठवण आहे का माहित नाही. मात्र त्यातील “ये मुलाकात इक बहाना है” हे गाणे अनेकांना आठवत असेल. हे नितांत सुंदर गाणे मला लता-खय्याम जोडीने दिलेल्या सुरेख गाण्यांमधले एक वाटते. गाणे पाहताना ज्याने चित्रपट पाहिला नाही त्यांनाही काय चालले आहे हे कळेल अशा तर्हेचे छायाचित्रण आहे हे दिग्दर्शकाचे कौशल्य. बाकी आम्ही काव्यशास्त्राचे विद्यार्थी. त्यामुळे समोर दिसेल त्यातून कायकाय जाणवतं हे शोधण्याची आमची हौस. कदाचित गीतकार आणि दिग्दर्शकाला ते अपेक्षितही नसेल. पण बनत असलेल्या इमारतीत जितेंद्र आणि बिंदिया गोस्वामीवर हे गाणे चित्रित झाले आहे. म्हणून असे वाटते घर नक्की कुणाचे बनणार आहे? गाणार्या नायिकेचे की आधीच्या प्रेयसीचे? हे तर दिग्दर्शकाला दाखवायचे नसेल?
जिंतेद्र हा मला वर्गात कधीही पहिला न आलेल्या पण फर्स्ट क्लासदेखिल न सोडलेल्या विद्यार्थ्यासारखा वाटतो. सिन्सियर विद्यार्थी. दिलेले काम इमाने इतबारे करणारा. जितेंद्रने वाईट काम केलेले मला आठवत नाही. त्याच्या चेहर्यावरूनच कळते की त्याला बिंदिया गोस्वामीने चालवलेले प्रणयाराधन मान्य नाही. कारण तो आधीच कुणात तरी गुंतलेला आहे. आणि नेमकी त्याची आधीची प्रेयसी इमारतीच्या खालून त्या दोघांना पाहते.गैरसमज करून घेते आणि निघून जाते. बिंदिया गोस्वामी जितेंद्रच्या प्रेमात इतकी बुडाली आहे की एका गाण्यातच काय वादळ घडून गेले याची तिला कल्पनाच नाही. “धडकने धडकनोंमें खो जायें, दिल को दिल के करीब लाना है’ असे शब्द नक्श लायलपुरी तिच्यासाठी लिहून गेले आहेत. अशा अवस्थेत असलेल्या नायिकेला आपल्या आजुबाजुला काय चालले आहे याची कल्पना कशी असणार? जितेंद्र, सुलक्षणा पंडित आणि बिंदिया गोस्वामी हे तिघेही पडद्यावरचे सिन्सियर विद्यार्थीच. पहिल्या पाचात न आलेले पण कधीही नापास देखिल न झालेले. गोड दिसणार्या बिंदिया गोस्वामीला प्रेक्षकांनी विद्या सिन्हाइतकेही स्विकारु नये याचे मला नेहेमी आश्चर्य वाटते.
बाकी गाणे आहे ते लता आणि खय्याम यांचेच. नक्श लायपुरींचे प्रेयसीच्या प्रेमाने भिजलेल्या हृदयाचे चपखल वर्णन करणारे शब्द आणि खय्यामचे संगीत. माणसाला सपाटून भूक लागलेली असावी आणि आवडत्या पदार्थाने शीगोशीग भरलेले ताट समोर यावे अगदी अशी भावना मला हे गाणे ऐकताना वाटते. दोन कडव्यांमधले संगीत देखिल पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटणारे, कर्णमधूर. गाण्याची सुरुवातच पाण्याचे एखादे कारंजे अचानक उसळून सुरु व्हावे अशी आहे. एखाद्या निराश माणसाने हे गाणे ऐकावे. पटकन त्याच्या चित्तवृत्तीत फरक पडेल. वाद्यांचे ते सुरेख स्वर ऐकू येतात आणि पुढे लता “ये मुलाकात इक बहाना है…” गाऊ लागते. गाण्याची आणि काव्याची प्रकृती ओळखून त्या विशिष्ट भावना आवाजात आणणे हे लताबाईंइतके आणखी कुणाला जमणार? नायिका नायकाच्या प्रेमात पडली आहे.पण हे प्रेम अवखळ नाही. संयत आहे. ही नायिका स्वप्नाळू आहे. तिला वाटते की हा आपल्या दोघांच्या प्रेमाचा सिलसिला जन्मोजन्मीचा आहे. आताची भेट तर फक्त निमित्त आहे. अशी नायिका नायकाला धावत येऊन मिठी मारणार नाही. नेमके हेच भाव खय्यामने संगीतात पकडले आहेत आणि लताने आवाजात.
आमच्यासारखे रसिक मात्र लता आणि खय्याम दोघांच्या प्रेमात आहेत. या गाण्याच्या निमित्ताने आमची या दोघांशी पुन्हा एकदा झालेली ही भेट. ही भेट देखिल एक निमित्तच आहे. कारण लता आणि खय्याम या दोघांबरोबर चाललेला आमचादेखिल प्यार का सिलसिला फार फार पुरानाच आहे.
अतुल ठाकुर