आनंदी स्वरातला मुकेश हा आपल्या फार ओळखीचा नाही. कारण मुकेश म्हणजे दर्द असं जणु समिकरण बनून गेलंय. दिलिपकुमार, राज कपूरने ते जास्त घट्ट केलं. पण मुकेशने सुखी माणसांची गाणीही बरीच गायिली आणि ती लोकप्रियसुद्धा झाली. “ये दिन क्या आये” हे बासु चटर्जींच्या “छोटीसी बात” मधील एक दुर्मिळ म्हणता येईल असं गाणं. रेडियोवर फारसं वाजलेलं ऐकलं नाही. कवी योगेश यांचे सिच्युएशनमध्ये चपखल बसणारे शब्द आणि त्याला दिलेली सलील चौधरींची अनोखी चाल. मूळात गाणे सुरु होते तेच अशा तर्हेने की ते संगीत ऐकून गाण्याचा मूड पटकन लक्षात यावा. सुकलेल्या, वर्षानुवर्ष पाणी न मिळालेल्या, तडे गेलेल्या जमिनीवर मुसळधार पाऊस पडावा आणि ती जमीन भिजून चिंब व्हावी अशी अवस्था सांगणारं हे गाणं आणि नेमकी तशीच अवस्था या चित्रपटाचा नायक अमोल पालेकर याची झालेली आहे.
लहानपणापासून आईवडिलांच्या सावलीत वाढलेल्या आणि आता एकट्या पडलेला आपला हा मध्यमवर्गीय नायक एका त्याच्यासारख्याच मध्यमवर्गीय नायिकेच्या प्रेमात पडतो. मात्र समस्या अशी असते की त्याच्या “रास्ते का कांटा” असरानी त्याच्याहून अनेक बाबतीत सवाई आणि स्मार्ट असतो. त्याला शह देण्याचे ट्रेनिंग अशोक कुमार नायकाला देतो. अमोल पालेकर त्या सार्या ट्रिक्स वापरून यशस्वी होतो. आणि आपल्या प्रियेला बरोबर घेऊन, तिच्या समोरच असरानीच्या स्मार्टनेसवर कुरघोडी करत त्याच्याहीपेक्षा सरस ठरतो. आणि सुरु होतं “ये दिन क्या आये…”
मुकेशचा मॅनली आवाज, अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाचे अगदी हवेहवेसे वाटणारे मध्यमवर्गीय लूक्स आणि मध्यमवर्गिय वागणे, बोलणे, चालणे, चायनीज खाताना असरानीची उडालेली तारांबळ, शेवटी त्यालाच भरावे लागलेले बिल, असरानीला ताटकळत ठेऊन त्याचा राग वाढवणे, अमोल पालेकरचे टेबल टेनिस खेळतानाचे मनोरंजक सीन्स, असरानीची तारांबळ पाहताना अशोक कुमारचे मिस्किल हसणे अशी एकूणच सुरेख रंगसंगती या गाण्यात जमली आहे. मुकेशच्या आवाजात अमोल पालेकरच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात. तृषार्त धरा नुसती शांतच झाली नाही तर तीवर आता हिरवेगार कोंबही फुटले आहेत ते जाणवतं.
सोने जैसी हो रही है हर सुबहा मेरी
लगे हर सांझ अब गुलाल से भरी
चलने लगी महकी हुई पवन मगन झुमके
आंचल तेरा चूमके…ये दिन क्या आये…
मनात प्रेम थुईथुई नाचु लागलं की आपोआपच आसमंतही देखणा वाटु लागतो. आतापर्यंत दबून राहिलेल्या नायकाला आपले प्रेम प्राप्त करण्याचा मार्ग मिळाला आहे. नव्हे ते त्याला प्राप्तच झाले आहे. बाकी या गाण्यासाठी मुकेशच्या आवाजाची निवड हा मला मास्टरस्ट्रोकच वाटतो. नेहेमी दर्दभरी गाणी गाणारा आवाज म्हणून हे आनंदी गाणे त्याला दिले असेल का? नेहेमी दबून राहिलेल्या नायकाला आता आनंद झाला आहे हे त्यातून सुचवायचं असेल का? मुकेशचे आणि दर्दचे नाते माहित असल्याने त्याला खेळकर आनंदाचे, स्वप्नपूर्तीचे गाणे देऊन सलीलदांनी नायकाच्या चित्रपटातील एकंदरीत सिच्युएशनलाच कवेत घेतले आहे. मला भावले ते या गाण्यातील जोडप्याचे मध्यमवर्गिय दिसणे. यातले काहीच अंगावर येत नाही. आणि आपल्या मनात झिरपत जातो तो मुकेशचा स्वर ज्या बरोबर आपणही गुणगुणु लागतो “देखो बसंती बसंती होने लगे, मेरे सपने…”
अतुल ठाकुर