डॉ. अनिता अवचट यांना पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. मुक्तांगणला गेल्यावर ही खंत नेहेमी जाणवते. एवढा दुरचा विचार करणारी व्यक्ती कशी असेल? त्यांच्या बद्दल फक्त आदर आणि भक्तीभावच वाटु शकतो. मात्र त्यांना जरी पाहिलं नाही तरी त्यांच्या तालमीत तयार झालेल्या माणसांना भेटण्याचा योग आला आहे. ढवळेसरांबद्दल माधवसरांनी अगोदर कल्पना दिली होतीच. ते मुक्तांगणच्या फॉलोअप विभागाचे प्रमुख आहेत. कर्हाड, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर आणि बेळगाव येथील फॉलोअप ग्रुप ते चालवतात. शिवाय पुण्यातल्या कॉउंसिलिंग सेंटरची जबाबदारी त्यांच्यावर आहेच. मुक्तांगणतर्फे इतर समुपदेशक महाराष्ट्रात जी फॉलोअप केंद्रे चालवतात तेथे दरवर्षी एकदा ते भेट देतात. एवढी मोठी जबाबदारी असलेले आणि दर महिन्याला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पालथा घालणारे ढवळे सर कसे असतील याबद्दल साशंक होतो. मोठ्या माणसांचा अनेकदा अत्यंत कडवट अनुभव आलेल्या माझ्यासारख्याच्या मनात काही तितक्याच कडवट कल्पना मोठ्या लोकांबद्दल असतात आणि दुर्दैवाने बरेचदा त्या खर्याही निघतात. पण ढवळे सरांनी सानंदाश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या सार्या व्यक्तीमत्वावर या मोठेपणाची छाया कुठेही दिसली नाही. खेळकर, मिस्किल असलेले ढवळेसर मुक्तांगणच्या प्रांगणात येऊन अनेकांशी सहजपणे बोलताना दिसले. माझ्यासारख्याशी बोलतानादेखिल आपल्या एखाद्या सहकार्याशी बोलावं त्या सहजतेने ते बोलले. आणि त्यामुळे त्यांनी मलाही नकळत मोकळं करुन टाकलं. मुक्तांगणमध्ये व्यसनी माणसांचा इगो मोडणे हे एक महा कर्मकठीण काम मानलं जातं. जो पर्यंत व्यसनाचा स्विकार होत नाही तोपर्यंत त्यावर उपचार करणे कठीण जाते. व्यसनमुक्तीतला हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. पण रुग्णांच्या आधी ढवळेसरांसारख्यांनी स्वतःतला इगो संपूर्णपणे नाहीसा केल्याचं चित्र दिसत होतं. आणि ते बरोबरच होतं. डॉ. अनिता अवचट यांनी गांधीवादाच्या पायावर मुक्तांगणची उभारणी केली होती. “जगात जो बदल तुम्हाला घडवायचा आहे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही स्वतः व्हा” या अर्थाचे गांधींचे एक वाक्य आहे. ढवळे सर स्वतः त्याचे उदाहरण आहेत. बाकी आपला मोठेपणा जराही जाणवु न देणारे ढवळे सर बोलु लागले कि त्यांच्यातलं अतिशय खोल पाणी दिसु लागतं आणि मग माझ्यासारख्या संशोधनासाठी गेलेल्याला त्यातुन काय घेऊ आणि किती घेऊ असं होऊन जातं.
ढवळेसरांशी ओळख झाल्यापासुन काही कठीण वाटणारे प्रश्न त्यांच्याकडे जाऊन विचारण्याची सवय लागली आहे. अतिशय व्यस्त अशा आपल्या दिनक्रमातही ते मला वेळ देतात आणि माझा कंटाळा करीत नाहीत हे मला येथे आवर्जुन नमुद करायला हवं. मुक्तांगणच्या उपचारपद्धतीत अल्कहोलिक अॅनोनिमस संस्थेचं महत्त्व खुप आहे. किंबहुना मुक्तांगणचे अनेक व्यसनमुक्त रुगणमित्र तेथील मिटिंग्ज नियमित अटेंड करणारे आहेत. मला हा प्रश्न पडत असे कि जर कोपर्या कोपर्यावर एएची केंद्रं आहेत तर लोकांनी मुक्तांगणमध्ये कशासाठी यायचं? यावर ढवळे सरांनी सविस्तर उत्तर दिलं. एएचं महत्त्व आहेच. पण एए व्यसनाव्यतिरिक्त इतर प्रश्नांमध्ये हात घालत नाही. मुक्तांगणने व्यसन हा कुटुंबाचा आजार मानला आहे. मुक्तांगणमध्ये रुग्णमित्रांच्या उपचारांच्या दरम्यान त्याच्या संपुर्ण कुटुंबाला सामिल केलं जातं. हा अतिशय महत्त्वाचा फरक या दोन संस्थांमध्ये आहे. व्यसनाच्या दरम्यान कुटुंबाची वाताहात झालेली असते. मुले घाबरलेली असतात. आईवडिलांना दु:ख झालेले असते. पत्नीला सततच्या तणावामुळे शारिरीक, मानसिक आजार जडलेला असण्याची शक्यता असते. सारे दु:ख मनातल्या मनात साठुन राहिलेले असते. त्याचा निचरा झालेला नसतो. पुढे पती व्यसनमुक्त झाल्यावर त्याची व्यसनमुक्ती कशी टिकवुन धरायची याची तिला कल्पना नसते. या सार्यांचे प्रशिक्षण तिला मुक्तांगणमध्ये मिळते. तिच्या दु:खाचा निचरा होतो. आपल्या हक्काचे कुटुंब आणि मैत्रिणी तिला मुक्तांगणमध्ये मिळतात. याशिवाय मुक्तांगणमध्ये नातेसंबंध कसे टिकवावेत, पैसा, वेळ यांचे नियोजन कसे करावे अशा तर्हेची अनेक वर्कशॉप्स होतात. त्याचे महत्त्व तर अपार असते. ढवळेसरांनी माझी एक शंका समुळ नाहिशी केली होती. दुसरी शंका “रॉकबॉटम” बद्दल होती. हा व्यसनाच्या परिभाषेतला एक महत्त्वाचा शब्द. व्यसनाचा अगदी तळ गाठलेल्या अवस्थेला रॉकबॉटम गाठणे म्हणतात. ही अवस्था प्रत्येकासाठी वेगवेगळी असु शकते. आणि बरेचदा हा रॉकबॉटम गाठलेल्या व्यक्तींना मुक्तांगणमध्ये यावंसं वाटतं. त्यांना कुठेतरी जाणवतं कि आपल्या व्यसनाने आता परिसिमा गाठली आहे. आता आपण थांबायला हवं. ते आले नाही तर त्यांचे कुटुंबिय त्यांना आणतात. पण आजकाल या रॉकबॉटमची व्याख्याच बदलुन गेली आहे. हा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
चर्चा करताना एकजण म्हणाला होता कि पुर्वी रॉकबॉटम म्हणजे दारुसाठी पैसे नसणे, त्यासाठी हात पसरावे लागणे, मुलेबाळे, संसार अक्षरशः रस्त्यावर येणे अशातर्हेचा असे. आता आयटी कंपनीत काम करणार्या माणसावर बहुधा ही वेळ येत नाही. भरपुर पगार असतो. पत्नीही तेवढाच पैसा मिळवत असते. पैशाच्या कमतरतेमुळे येणार्या रॉकबॉटमची चर्चा जेव्हा जुनी माणसे करतात तेव्हा हे नवे व्यसनीरुग्णमित्र त्या अनुभवाशी रिलेट असे होणार? हा अनुभव त्यांना येणारच नसतो. हा प्रश्न मला निरुत्तर करणारा होता. मात्र ढवळेसरांना उत्तर देताना क्षणाचाही वेळ लागला नाही. ते शांतपणे म्हणाले,” रॉकबॉटम फक्त पैशाच्याच बाबतीत असतो असं थोडंच आहे? बायका मुलं विचारत नाहीत. आई वडिल बोलत नाहीत. कामावर चुका होतात. सहकारी मित्र टाळु लागतात. समाजात बदनामी होते. पत्नी घटस्फोट देते. या सार्या गोष्टी पैसा मुबलक प्रमाणात असताना देखिल घडु शकतात. हा देखिल व्यसनातला रॉकबॉटमच आहे. काळ बदलत चालला तशी रॉकबॉटमची कल्पना बदलली असेल. पण व्यसनात हा टप्पा केव्हातरी येतोच. फक्त प्रत्येकाच्या बाबतीत तो वेगवेगळा असुन शकतो.” ढवळेसरांनी एक उदाहरणही दिलं. व्यसनात बुडालेल्या एका अतिशय श्रीमंत माणसाच्या आईने त्यांना आपल्या मुलाला भेटुन समजवण्याची विनंती केली होती. ते गेले तेव्हा साहेबांचं मद्यपानच चाललं होतं. साहेबांनी नाखुशीनेच ढवळे सरांना बसायला सांगितलं आणि आपण स्कॉचशिवाय कुठलिहि दारु पित नाही हेही सुनावलं. काही वेळाने सर जायला निघाले तेव्हा त्यामाणसाची छोटी मुलगी तेथे आली. तिची खेळकरपणे विचारपूस करत असताना ती छोटी आपल्या वडीलांसमोरच म्हणाली की माझ्या वडिलांकडे मला संध्याकाळी सातनंतर जायला आवडत नाही. त्यावेळी ते दारु पित असतात. मुलिच्या तोंडचे वाक्य ऐकुन साहेब खजिल झाले आणि तेथे सारा ताठा उतरलेला एक बाप उरला. त्यांनी ढवळेसरांसमोर मान्य केले कि आज माझ्याकडे सारे काही आहे पण माझी मुलगी खुश नाही. रॉकबॉटम श्रीमंत माणसांचाही असु शकतो आणि तो कशा तर्हेचा असतो हे मला या उदाहरणाने कळुन आले.
सागरसरांबरोबर बोलताना त्यांनी मला ढवळेसरांचे ग्रुप आवर्जुन अटेण्ड करायला सांगितले होते. थोडा उशीरच झाला होता. वरच्या मजल्यावर ग्रुप सरु झाला होता. ढवळेसर एका साध्या खुर्चीवर बसुन बोलत होते. सभोवताली बेडवर रुग्णमित्र बसले होते. वर फळा होता. आपल्या विषयात पारंगत असलेल्या एखाद्या कसलेल्या प्रोफेसरप्रमाणे ढवळेसरांचा ग्रुप सुरु झाला होता. आजचा विषय होता “डिसीज कन्सेप्ट”. व्यसन कसं सुरु होतं, कसं वाढतं? त्याचे प्रकार किती असतात, पुढे ते कुठल्या टप्प्याने वाढत जातं याची शास्त्रीय माहिती ढवळे सर अतिशय साध्या भाषेत देत होते. बरोबरच उदाहरणे देऊन मुद्दा स्पष्ट केला जात होता. हळुहळु रुग्णमित्रांना त्यात ओळखिच्या खुणा दिसु लागल्या. त्यांच्या माना डोलु लागल्या. सांगितलेले पटु लागले. कुठेतरी हास्याची कारंजी उडु लागली. व्यसनाचा आजार किती घातक आहे हे सांगताना त्यांनी अमेरिकेत घडलेले एक उदाहरण दिले. एका मुलाला चौदाव्या वर्षी दारुची सवय लागली आणि त्याचे व्यसनात रुपांतर झाले. पुढे त्यावर उपाय होऊन तरुण झालेल्या त्या मुलाने विसाव्या वर्षी दारु सोडली. त्यानंतर जवळपास पन्नास वर्षे तो माणुस दारुला शिवला नाही. वयाच्या सत्तराव्या वर्षी त्याने फक्त दोन पेग घेतले आणि पन्नास वर्षे दारुपासुन दुर राहिलेल्या या माणसाला बहात्तराव्या वर्षी व्यसनामुळे मृत्यु आला. ढवळेसरांकडे अशा अनेक गोष्टींचा साठा आहे. ते मुक्तांगणमध्ये दाखल झालेल्या, फक्त ३१ डिसेंबरला पिणार्या माणसाची चर्चा करतात. फक्त एकच दिवस पिणार्याला मुक्तांगणची गरज का भासली? कारण उरलेले ३६४ दिवस तो माणुस कधी ३१ डिसेंबर येईल आणि मला कधी दारु प्यायला मिळेल याचाच विचार करीत होता. सरांच्या ग्रुप मध्ये आणि त्यांच्या व्यसनाबाबतच्या एकंदरीत अॅप्रोचमध्ये मला एक वेगळेपणा जाणवला. व्यसन हा आजार आहे. व्यसन वाईट असते. व्यसनी माणुस वाईट नसतो हे आपण अनेकदा ऐकतो. पण बरेचदा ते ऐकण्यापुरतेच असते. सरांनी मात्र ही दोरी घट्ट पकडली आहे. व्यसनीमाणुस हा माणूस म्हणुन वाईट नसतो हे सांगण्यावर ते आवर्जुन भर देतात. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. कारण व्यसनीमाणुस हा समाजात बदनाम झालेला असतो. घरात, मित्रांमध्ये त्याने आपली पत गमावलेली असते. आपण वाईट आहोत हे सतत ऐकुन त्याचा आत्मविश्वास नाहिसा झालेला असतो. स्वतःबद्दलचा आदर त्याने गमावलेला असतो. अशावेळी ढवळेसरांचा सकारात्मक दृष्टीकोण मदतीला येतो.
ढवळेसर सांगु लागतात. व्यसन हा भावना आणि विचारांचा आजार आहे. व्यसनी माणुस वाईट नसतो. मात्र व्यसनाच्या दरम्यान त्याचे भावनांवरचे नियंत्रण नाहीसे होते. आपल्या सर्वांच्या शरिरात एक अननोन फॅक्टर असतो जो व्यसनी माणसात कार्यरत झालेला असतो. ज्यांच्या शरिरात तो कार्यरत होत नाही ती माणसे दारु पिऊनदेखिल आयुष्यभर सोशल ड्रिंकरच राहतात. व्यसनीमाणसाला मात्र बाटलीचे झाकण बंद करता येत नाही. त्याचे शरीर आणखि दारुची मागणी करीत राहते. हे त्या अननोन फॅक्टरमुळे घडते. पुढे ढवळेसर उदाहरण देतात. व्यसनीमाणसाला बायको सकाळी पन्नास रुपये देऊन दुध आणायला सांगते. त्याचे हात कापत असतात. त्याला उतारा हवा असतो. तो प्रामाणिक विचार करतो. फक्त दहा रुपयाची दारु पिऊया आणि चाळीस रुपयांचे दुध आणुया. हात कापायचे थांबतील. या विचारांपर्यंत तो प्रामाणिक आहे. ढवळेसर प्रामाणिक हाच शब्द वापरतात. तो दहारुपयांची दारु पितो. तेथे हा फॅक्टर कार्यरत झालेला असतो. त्याचे शरिर आणखि मागणी करु लागते. पुढे तो विचार करतो आणखि दहा रुपयांची दारु पिऊया आणि स्वस्तातले तीस रुपयांचे दुध घरी नेऊया. अजुनही घरच्यांचा विचार त्याच्या डोक्यात असतोच. पण हा फॅक्टर इतका बलवान असतो कि त्याच्या हातुन सारे पैसे खर्च होतात. समाज व्यसनी माणसाला एका झटक्यात बेजबाबदार, दुर्वर्तनी, वाईट म्हणुन निकालात काढतो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे ढवळेसर वारंवार अधोरेखित करतात. सतत बोलणी खाण्याची सवय झालेल्या व्यसनी माणसाला यामुळे किती दिलासा मिळत असेल याची कल्पना मला तेव्हा आली. आपले सुद्धा व्यसनाबद्दल किती गैरसमज होते हे देखिल स्वच्छपणे उमगले. मुक्तांगणमध्ये व्यसन हा आजार आहे, तु वाईट नाहीस तुझे व्यसन वाईट आहे हे व्यसनीमाणसाच्या मनावर नेहेमी बिंबवलं जातं. ज्या अननोन फॅक्टरमुळे हे शरिर दारुची मागणी करते तो फॅक्टर नियंत्रणात ठेवता येतो. तो कसा नियंत्रणात ठेवता येईल हे शिकवलं जातं. ग्रुपच्या शेवटी रुग्णमित्रांनी अनेक शंका विचारल्या. ढवळे सरांनी त्यांचे समाधान केले. सरांचे समजवणे हे सहज आहे. त्यात कसलाही अट्टाहास नाही. टोकाचा आग्रह नाही. समोरच्या बसलेल्या रुग्णमित्रांपैकी काही जण पुन्हा दाखल झाले होते. त्यांचा इतिहास सरांना ठाऊक होता. खेळकरपणे त्यांना अधुनमधुन चिमटा काढीत हा ग्रुप सरांनी घेतला होता. वातावरण अतिशय हलकेफुलके झाले होते.
ढवळेसरांकडुन मोठ्यामॅडम म्हणजे डॉ. अनिता अवचट यांच्याबद्दल खुप काही ऐकायचं आहे. समजुन घ्यायचं आहे. जवळपास पंचविस वर्षे व्यसनापासुन दुर राहिलेले ढवळे सर मोठ्या मॅडमच्या शिकवणुकीत तयार झाले. समुपदेशन कसे असावे याचे धडे त्यांनी मॅडमकडे गिरवले. आपला पेशंट स्लीप झाला याचं अतिशय दु:ख झालेल्या ढवळे सरांना मॅडमनी कानमंत्र दिला होता. पेशंटला मदत करायची असेल तर त्याच्यात अडकु नकोस. माझा पेशंट बरा झलाच पाहिजे या वाक्यातला “च” काढुन टाक. प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. देत राहणं हे तुझं काम आहे. जर ते बरे झाले तर पाच टक्के तुझे प्रयत्न आणि पंच्याण्णव टक्के त्यांचे प्रयत्न असे मान. जर ते बरे झाले नाहीत तर तात्पुरते तरी १००% टक्के तुझेच अपयश आहे असे मान. तरच त्यांना पुन्हा मदत करशील. मॅडमची ही शिकवण सरांच्या समुपदेशनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आज सर साठीच्या जवळपास आलेत पण त्यांच्या खेळकरपणाचाच परिणाम असेल कदाचित पण ते साठीचे मुळीच वाटत नाहीत. मुक्तांगणमध्ये त्यांना प्रेमाने तात्या म्हणुन हाक मारतात. काहीवेळा तरुण समुपदेशक त्यांची त्यांची खेळकर थट्टाही करतात. पण समस्या आली की तात्यांशिवाय पर्याय नसतो. अतिशय जुने रुग्णमित्र सरांच्या संपर्कात आहेत. त्यांचं नेटवर्क प्रचंड आहे. सरांच्या ज्ञानाला पंचविस वर्षांच्या डोळस अनुभवाची जोड आहे. सरांचे नाव प्रसाद आहे. मला आजवर देवाचा प्रसादच माहित होता. पण अनुभवाच्या कसोटीवर घासुन पक्क्या झालेल्या, इतक्या वर्षाच्या पायपीटीतुन तावुन सुलाखुन निघालेल्या ज्ञानाचा प्रसाद ते माझ्यासारख्याला आपलेपणाने देत असतात. संशोधन करताना मुक्तांगणने सरांच्या रुपाने आपले ज्ञानभाण्डारच माझ्यासाठी खुले केले आहे असे मला वाटते.
अतुल ठाकुर