अलिकडेच काही कामासाठी विद्यापिठात गेलो होतो. आमचे समाजशास्त्राचे प्राध्यापक भेटले. ते निवृत्त झाले होते. ते ही काही कामासाठी आले असावेत. ते आपल्या गाडीत आणि मी बाहेर असा काहीकाळ सुखसंवाद झाला. अतिशय कडवे मार्क्सवादी असलेले सर आता काहीसे निराश वाटत होते. जीवनाला अर्थ नाही. आपण त्याला जो देऊ तोच अर्थ आणि तो देखील बरोबर असेलच असं नाही याची जाणीव असायला हवी असं काहीतरी बोलत होते. या सरांशी संवाद होऊ शकतो असा माझा अनुभव होता. विद्यापिठातल्या इतर डाव्या विद्वानांबद्दल मनात अत्यंत तिरस्कार असल्याने ती मंडळी कधी भेटली तर मी बोलणे टाळतोच. यांचा एक अपवाद. ते नेहेमीचीच तक्रार करत होते पण आवाजात पूर्वीसारखा जोश नव्हता. सध्या “हाऊ टू” चा जमाना आहे “व्हाय” हा प्रश्न कुणी विचारत नाही आणि विचारला तर त्याला गप्प केले जाते. मार्क्सवादी मांडणीप्रमाणे सिस्टीममध्येच प्रॉब्लेम आहे. त्याबद्दल बोलायला कुणीच तयार होत नाही हे सरांचे दुखणे होते.
मी काय करतोय याबद्दल मी विद्यापिठात किंवा त्याच्या आवारात बोलत नाही कारण अनेक विद्वानांच्या मते “व्यसनमुक्ती” हे काम फारसे महत्वाचे नसावे. त्याने कुठे सर्वंकष क्रांती होते? सरांना सिस्टीम बदलणे महत्वाचे वाटत होते. नेमके इथेच मला गांधी महत्वाचे वाटू लागले होते. गांधींना माणसांच्या मर्यादांचे भान होते. ज्याला आवडेल, जे झेपेल असा कार्यक्रम देण्यास ते तयार होते. याचा अर्थ त्यांना सिस्टीममधल्या खाचाखोचा माहितीन नव्हत्या असं नव्हतं. जो आपल्या मर्यादेत राहून आपल्याला झेपेल तेच काम करु इच्छित असतो त्याला समाजाचे व्यापक प्रश्न माहित नसतात हा डाव्या विद्वानांचा अत्यंत आवडता गैरसमज आहे. गंमत म्हणजे याच विचारसरणीमुळे एकदा क्लास नाहीसा झाला की कास्ट आपोआपच नाहीशी होईल असे काहीजण मानत. किंबहूना उद्योगिकीकरण झाले की कास्ट नाहीशा होणार हे भाकीतही खरे झाले नाही. आज आपल्याला उद्योगिकीकरणाच्या रेट्यामुळे गाडीत आपल्याबाजूला कोण बसलंय त्याची जात नाहीत नसते आणि आपण त्याची पर्वाही करीत नाही हे खरे असले तरी राजकारणात जातींचे ध्रूवीकरण झाले आहे हे अमान्य करता येणार नाही.
जगभर मार्क्सवाद संपत आला. जेथे टिकवण्याचा प्रयत्न झाला तेथे प्रचंड रक्तपात झाला. अनेक मार्क्सवादी विद्वानांचा असा समज आहे की मार्क्सवाद इव्हॉल्व होतो आहे. मार्क्सला अभिप्रेत क्रांती जेव्हा येईल तेव्हा येईल. पण ज्याला आपल्या मर्यादेत राहून काही काम करायचे आहे त्याच्याबद्दल तुच्छता व्यक्त करणे हा आयव्हरी टॉवरमध्ये राहणाऱ्या विद्वानांचा एक आवडता छंद होऊन बसला हे नक्की. अर्थातच अशांची मान्यता आपल्या कामाला मिळावी असं मला आता वाटत नाही. याचं एक महत्वाचं कारण लोकांचे माझ्या अगदी छोट्याशा कामाबद्दल चांगले अभिप्राय येऊ लागले हे आहे. मला आज देखील कुणी म्हटले की “तुमचं व्यसनमुक्तीवरचं लेखन वाचून व्यसन सोडावंसं वाटलं”, “तुमच्या लेखनामुळे व्यसनमुक्त राहायला मदत होते” की फार समाधान वाटते. या समाधानाचे मोल कशानेही होऊ शकत नाही. सर्वंकष क्रांती यायची तेव्हा येवो. एक माणुस बदलतो तेव्हा त्या प्रमाणात समाजही बदलतो हे मला पटलंय.
अतुल ठाकुर