काही गाण्यांचे संगीत अशा तर्हेने दिलेले असते की माणुस आपोआपच गतकाळच्या स्मृतीत जातो. आणि चित्रपटातली सिच्युएशनही तशीच असेल तर मग पाहायलाच नको. त्यातही गुलजारसारखा कवि आणि दिद्गर्शक असेल, शर्मिलाटागोर आणि संजीवकुमारसारखे कसलेले कलाकार असतील, लता आणि भुपेंद्रसारखे गायक असतील आणि मदनमोहनसारखा संगीतकार असेल तर गाण्यात काय काय चमत्कार घडू शकतील हे पाहायचं असेल तर १९७५ साली आलेल्या गुलजारच्या “मौसम” चित्रपटातील “दिल ढूंढता है” हे द्वंद्वगीत पाहावे. बर्याच जणांना फक्त भुपेंद्रच्या गाण्याची आवृत्ती आवडली असण्याची शक्यता आहे. मलाही ते गाणे खूप आवडते. द्वंद्व गीतात तर भुपेंद्रच्या वाट्याला फक्त दोनच ओळी आल्या आहेत. पण ते ही अशा ठिकाणी खुबीने म्हटलं गेलंय की प्रेयसीला साथ देणारा प्रियकरच समोर यावा.
“फुरसतके रात दिन” शोधणारे युगुल एकमेकांत अगदी रमुन गेलेले या गाण्यात दिसतात. पण त्या आधी गुलजारने तो एक चमत्कार केला आहे. वयस्क संजीव कुमार पुर्वस्मृती जागवत अशा ठिकाणी फिरतो जेथे तरुणपणी त्याची प्रेयसी शर्मिला टॅगोर त्याच्याबरोबर असते. त्यावेळी त्याला त्याची तरुणपणची प्रतिमा प्रेयसीबरोबर दिसते आणि त्या दोघांच्या तोंडी हे गाणे गुलजारने दिले आहे. हे सारे पाहात असताना हा सीन अक्षरशः डोक्यात भिनतो. हे सारं काही इतक्या अप्रतिमरित्या चित्रीत झालं आहे कि प्रेक्षक गाण्यात गुंतून जातो. या गाण्याची सुरुवात विशेषतः लताची सुरुवातीची लकेर आणि त्यावेळचं संगीत जर डोळे मिटुन ऐकलं तर हे नक्की जाणवेल की हे गाणंच मुळात सारा स्मृतींचाच खेळ आहे. लताची लकेर येते, कॅमेरा आभाळ, बर्फाने आच्छादलेले पर्वत आणि उंच उंच झाडांवर फिरतो. संजीवकुमार आपण तरुणपणी आपल्या प्रेयसीबरोबर जेथे फिरलो होतो त्या जागा निरखत असतानाच झाडामागून पुढे येतो आणि अचानक समोरुन तरुण शर्मिला आणि संजीवकुमार समोर येतात. गाणे सुरु होते…
आपल्याच प्रतिमेला पाहणारा संजीवकुमार त्या दोघांच्या मागे मागे जात गतकाळ आठवत असतो. कधी तो स्वतःकडे पाहतो, कधी शर्मिलाकडे. कधी टेकाडावर निवांत बसून खाली एकमेकांच्या बाहुपाशात रमलेल्या दोघांना पाहतो. एकाठिकाणी हे युगुल मोठाले बुंधे असलेल्या जणु काही एकाच मुळापासून निघालेल्या दोन झाडांसमोर थांबते. ही झाडे म्हणजे दोन शरीरे आणि एकच हृदय असलेल्या त्या दोघांचे प्रतिकच. ती दोघे पुढे निघून गेल्यावर वृद्ध संजीवकुमार त्या बुंध्यावरून हात फिरवून एक निश्वास सोडतो. त्या एका कृतीत त्याची सारी खंत कळून येते. कसलेले अभिनेते असले म्हणजे आधीच सुंदर असलेल्या गाण्याला आणखी उंचावर नेतात. दोन लांब वेण्या घातलेली शर्मिला दिसली आहे सुरेखच पण तिचे सहज चालणे देखील येथे खुप लोभसवाणे झाले आहे. दोघेही तसे प्रौढ दाखवले आहेत त्यामुळे धसमुसळेपणा नाही. संयत प्रणय आहे.
लताच्या कोवळ्या आवाजाने कमाल केलीय. मदनमोहनच्या संगीतात काहीवेळी लताचा आवाज वेगळाच आकर्षक भासतो असे आपले माझे मत. भुपेंद्र “दिल ढुंढता..है फिर वोही” असे म्हणतो तर लता सरळ “दिल ढुंढताहै” असे म्हणते, ते ही मस्त वाटते. गुलजारने गालिबच्या पहिल्या ओळी घेऊन लिहिलेल्या या गीताची सुरुवात “जी ढुंढता है” अशी होती असा किस्सा आहे. मात्र मदनमोहनने या ओळी “दिल ढुंढता है” अशा बदलल्या आणि गुलजार थक्क होऊन गेला. चक्क गालिबच्या ओळींत बदल? मात्र त्यावेळचे संगीतकार देखिल असे जाणकार होते कि मदनमोहनने त्याच्याकडील गालिबच्या पुस्तकाची आवृत्ती आणली होती आणि त्याने गुलजारला पटवुन दिलं की काही आवृत्त्यांमध्ये “दिल ढुंढता है” असं आहे. शेवटी तो बदल स्विकारला गेला
एकंदरीतच अगदी वेगळे गाणे. काळाच्या पुढचे चित्रिकरण. एकमेकांच्या प्रेमात गुंतुन गेलेले प्रेमी युगुल आणी त्यांना आठवणारा, समोर पाहाणारा वृद्ध संजीव कुमार, त्यात मदनमोहनची आकर्षक चाल आणि लताने मोहकपणे म्हटलेले गुलजारचे बोल, तिला पूरक वाटणारा भुपेंद्रचा आवाज. आणखी काय हवे?
अतुल ठाकुर