चित्रपटातील एका (पुन्हा न पाहिलेल्या) दृष्याबद्दल

0
8

काहीवेळा आपली आपल्यालाच नविन ओळख होते. अरेच्या आपण असे आहोत. आपल्यात हा देखिल एक कंगोरा आहे. आणि आपले आपल्यालाच आश्चर्य वाटते. हिन्दी चित्रपट पाहण्याची सुरुवात अगदी लहानपणापासून झाली. सर्व तर्‍हेचे चित्रपट पाहिले. जसजशी समज वाढली तसा मसाला चित्रपट म्हणजे काय ते लक्षात आलं. चित्रपटात मसाला टाकला जातो. त्यात मारामार्‍या असतात. नृत्य असतात. तोकड्या कपड्यात वावरणार्‍या नायिका असतात. हेलनच्या कॅब्रे नृत्याने पडदा पेटायचा. आणि आम्हीही…यात कधी काही गैर वाटलं नाही. हिंसेचा अतिरेक असलेले चित्रपट पाहिले. धक्कादायक दृश्ये पाहिली. पण कधी एखादे दृश्य पुन्हा कधीही पाहू शकणार नाही असे वाटले नाही. आणि बर्‍याच वर्षांनी चार्लस ब्रॉन्सनचा डेथ विश (पहिला भाग) पाहिला.

ब्रॉन्सन हा माझा अतिशय आवडता अभिनेता. मात्र डेथ विश हा मला त्याचा सर्वात जास्त आवडणार चित्रपट नव्हे. ती जागा सर्जीयो लियॉनीच्या “वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्ट” ने घेतली आहे. अर्थात डेथ विश हा देखील अतिशय उत्तम चित्रपट. या विजिलांटीच्या थीम वर पुढे कित्येक चित्रपट निघाले. समाजातील गुन्हेगारीसमोर जेव्हा पोलिस हतबल होतात तेव्हा समाजातीलच या गुन्हेगारीने पोळलेला एक सर्वसामान्य माणूस कायदा हातात घेऊन गुन्हेगारांना ठार मारतो आणि पोलिसांची त्याला सहानुभूती असते. हे कथानक आपल्यापैकी अनेकांनी ओळखीचे वाटेल. या चित्रपटात अगदी सुरुवातीलाच ब्रॉन्सनच्या बायको आणि मुलीवर अत्याचार होतो. बायको मृत्युमुखी पडते आणि मुलगी मानसिकदृष्ट्या कायमची अपंग होते. यानंतर ब्रॉन्सन कायदा हातात घेतो. तो सर्व प्रवासच जबरदस्त.

पण मला बोलायचंय ते त्या अत्याचाराच्या दृश्याबद्दल. ते पहिल्यांदा पाहिलं आणि खुप धक्का बसला होता. त्यानंतर आजवर असंख्यवेळा डेथविश पाहिला असेल. पण कधीही ते दृश्य पुन्हा पाहु शकलो नाही. जेव्हा जेव्हा हा चित्रपट पाहिला तेव्हा हे दृश्य टाळून मी पुढचा चित्रपट पाहात असतो. मला हे माझ्यासाठी नविनच होतं. तेव्हा लक्षात आलं कि सिनेमा हे प्रामुख्याने दिग्दर्शकाचं माध्यम आहे. तो दाखवेल ते आणि तो दाखवेल तसं आम्ही पाहणार. काही प्रेक्षकांच्या सोयीसाठी टाकलेला मसाला असेल तर ते दृश्य तसेच दिसणार. प्रेक्षक ते मिटक्या मारत पाहणार आणि तुम्हाला बलात्कार्‍यांची घृणा यावी असं वाटत असेल तर ते ही दिग्दर्शकाच्याच हातात आहे. ब्रॉन्सनच्या बायको आणि मुलीवर चित्रित झालेला तो सीन इतका अंगावर येणारा आहे की त्यानंतर ब्रॉन्सन निघृणपणे गुन्हेगारांना ठार मारतो ते (कायद्याच्या दृष्टीने गैर असले तरी) गैर वाटत नाही. प्रेक्षक नकळत त्याच्या बाजूने होऊ लागतात.

नंतर लक्षात आले काही चित्रपट, काही दृश्ये बहुधा आपण पुन्हा पाहु शकणार नाही इतके कारुण्य त्यात असते. आणि ही दिग्दर्शकाची कमाल असते.

अतुल ठाकुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here