जुनी हिन्दी गाणी हा पूर्वीपासुनचा जिव्हाळ्याचा विषय. मित्रांशी चर्चा करताना माझ्याकडुन याबाबत तरी गाण्याच्या बाबतीत किंवा गायक गायिकेच्या बाबतीत पक्षपात होतोच. मात्र “कुछ दिलने कहा” वर वाद घालावासा वाटत नाही इतकं ते गाणं भावतं. लताच्या आवाजातले या गाण्याचे आर्त सुर कानावर आले की क्षणभर सारंकाही विसरुन मन भूतकाळात जातं. मला तर का कुणास ठावूक पण माझं गावी गेलेलं लहानपण आठवतं. हूरहूर लावणारी माणसं,घरं, झाडं, पानं, शेतं, गल्ली बोळ आठवतात. गरीब पण माया लावणारे आदिवासी आठवतात. एका वेगळ्याच विश्वात नेण्याची ताकद या ग़ाण्यात आहे. लताच्या दैवी आवाजाची जोड आठवणींची नवीन दालनं उघडते. ग़ाण्याची सुरवात एका हळव्या मनाची अवस्था सांगणारी आहे. हे मन अस्वस्थ होण्याइतपत प्रौढ नाही, तर अजुनही अल्लड आहे. तारुण्य साद घालतं आहे पण कसलीतरी विवशता आहे. प्रतिसाद न देण्याची…….
तीन आपापल्या क्षेत्रात अतिशय नावाजलेल्या व्यक्तींनी हे गाणं घडवलेलं आहे. लताचा आवाज, हेमंतकुमारचं संगीत आणि कैफी आझमीचं गीत असा हा विलक्षण योग आहे.
लेता है दिल अंगडाईया,
इस दिलको समझाये कोई
अरमां ना आंखें खोल दे,
रुसवा ना हो जाये कोई
पलकोंकि ठंडी सेज पर,
सपनोंकी परियां सोतीं है
ऐसी भी बातें होती है,
ऐसी भी बातें होती है……
दिलकी तसल्ली के लिये,
झुठी चमक झुठा निखार
जीवन तो सुना ही रहा,
सब समझे आई है बहार
कलीयोंसे कोई पुछता,
हसतीं है वो या रोतीं है
ऐसी भी बातें होती है,
ऐसी भी बातें होती है…….
पहिल्या चार ओळींमध्ये तरुण मनाला समजवण्याची धडपड जाणवते. कुणीतरी रागवेल म्हणून तारुण्यसुलभ, कोमल भावनांना वाट मोकळी करुन देता येत नाहीय. सारी कोवळी स्वप्नं पापण्यांच्या आडच राहतात. निसर्ग आपलं काम करतोच आहे. भावना उफाळून येतच आहेत. हा कोंडमारा कवीने अतिशय संयत शब्दांमध्ये मांडला आहे. पुढच्या ओळींत नायिका आपली व्यथा सांगताना म्हणते, मनाच्या खोट्या समाधानासाठी, सारे बेगडी खेळ चालले आहेत. वरकरणी दिसणार्या पोकळ बहराआड सुनं दु:ख वावरतं आहे. मात्र आजुबाजुच्या प्रत्येकाला हे खोटे मुखवटेच हवेत. त्याआड लपलेले चेहरे हसताहेत की रडताहेत हे पहायला वेळ आहे कुणाकडे?
वरकरणी साधी वाटणारी तरीही साधी नसलेली ही चाल या सुंदर गीताला हेमंत कुमारने लावली आहे. मला या संगीतकाराच्या चाली नेहेमीच वेगळ्या वळणाच्या वाटत आल्या आहेत. काहीशा संथ, खोल आणि विषयाशी एकरुप झालेल्या. “कुछ दिलने कहा” ऐकताना मन दूर निघुन जातं, वेगळ्या वाटेवर, स्वत:चीच सोबत घेउन, जुन्या आठवणी, सुख-दु:ख आठवत, शांत बसावसं वाटतं. विषारी जाळी, जळमटं दुर करुन मनाला निरामय आनंद देणारी अशी ही सुंदर चाल आहे. मन थकलं, भागलं असेल, निवांतपणा हवा असेल तेव्हा हे गाणं ऐकुन पाहावं. हळुवारपणे हे गाणं आपल्याभोवती शांत वातावरण निर्माण करतं, डोळे आपोआप मिटतात आणि ऐकणारा त्यात समरस होऊन जातो.
गाणे पाहताना त्याचे चित्रिकरणही अगदी वेगळ्याच पद्धतीने झालेले जाणवते. १९६६ चा कृष्णधवल चित्रपट. आधीच काळ्या पांढर्या रंगाचं गारुड गाण्यावर झालेलं. त्यात अतिशय उंच वृक्ष आणि आसपासची वनराजी, डोंगर, झाडंझुडपं, उंच वाढलेलं गवत. हे लोकेशन ज्याने निवडलं त्याला पहिला नमस्कार. मासोळीसारखे डोळे असलेली नाजुक शर्मिला. तिच्या गालावरच्या खळ्या दिसतील न दिसतील अशा. लताच्या कोवळ्या आवाजातले ते स्वर. कृष्णधवल रंगातल्या पार्श्वभूमीवर शर्मिलाची साडी जणू प्रकाशाचेच वस्त्र विणून बनवल्यासारखी वाटते. आणि प्रकाशात लपेटलेली शर्मिला हे तारुण्याचे गाणे गात असताना धर्मेंद्र तिच्याकडे दूरून पाहात राहतो. धरमसाहेब शाल लपेटून रुबाबदार देखणे दिसलेत.
लताने अप्रतिम गाणी असंख्य दिली पण माझ्यासाठी हे गाणं म्हणजे अनमोल रत्न आहे. अनेक वर्ष हिन्दी चित्रपट संगीत मी ऐकतो आहे. या संगीताचा एक छोटासा चाहता म्हणुन काहीवेळा एखाद्या गायकाची सर्वोत्कॄष्ट दहा गाणी आपण कुठली निवडू यावर विचार करण्याचा माझा छंद आहे. लताची सर्वोत्कॄष्ट दहा गाणी तर सोडाच पण संपुर्ण हिन्दी चित्रपटातली फक्त दहा गाणी मला निवडावी लागली तरीदेखील या गाण्याला मी स्थान देईन. चांगली गाणी अनेक असतात, काही लक्षात राहतात, काही विसरली जातात. मात्र आठवणींच्या हिदोळ्यांवर झुलवणारी “कुछ दिलने कहा” सारखी गाणी खरोखर दुर्मिळच!
अतुल ठाकुर