किरातार्जुनीयम् चे देणे

0
10

संस्कृतातील अनेक नाटकांमधल्या अनेक गोष्टी आवडतात हे खरे असले तरी भारविच्या किरातार्जुनीयम् नाटकातील अकरावा सर्ग हा माझ्या फार आवडीचा आहे. मानसशास्त्राचा अभ्यास सुरु केल्यावर तर तो मला नुसता आवडीचाच नाही तर पुन्हा पुन्हा वाचण्याजोगा वाटू लागला आहे. आपण एखादी चांगली गोष्ट सुरु केल्यावर आपल्या समोर येऊन आपल्याला हतोत्साह करणारी अनेक माणसे असतात. काहीजण काळजीच्या नावाखाली तुमच्या मनात नकारात्मकता पेरून जातात. काहीजण तुम्ही घेतलेले काम थांबबावे म्हणूनच मनात भीती पेरतात. आपण पुरेसे सावध असलो ही माणसे ओळखायला वेळ लागत नाही. मात्र याहूनही सूक्ष्म प्रकार आहे जो तत्वज्ञानाच्या रुपाने अवतरतो. याचा प्रतिकार अवघड असतो. त्याने जर तुमच्या मनाचा ताबा घेतला तर तुमच्यातच काम सुरु करण्याचा उत्साह राहत नाही. मग इतरांनी तुम्हाला थांबवण्यासाठी वेगळे काही करण्याची गरजच उरत नाही. किरातार्जुनीयम् मध्ये अर्जुन महाभारत युद्धासाठी साक्षात शंकराकडून शस्त्र मिळवण्यासाठी तप करीत असल्याची कथा आहे. या कथेची पार्श्वभूमी आधी लक्षात घ्यायला हवी.

द्युतात हरलेले, द्रौपदीच्या वस्त्रहरणामुळे अपमानीत झालेले पांडव वनवास आणि अज्ञातवासाची शिक्षा भोगण्यासाठी बाहेर पडले आहेत. आणि युद्ध अटळ आहे याची युधिष्ठीराला जाणीव झालेली आहे. अशावेळी आपले पारडे वरचढ असावे यासाठी त्याने अर्जुनाला शस्त्र मिळविण्यासाठी तप करायला पाठवले आहे. अर्जुन आधी इंद्राची प्रार्थना करीत आहे. यावेळी इंद्राने वृद्धाचे रुप धारण करुन अर्जुनाची परीक्षा पाहण्यासाठी जो उपदेश केला आहे तो उपदेश आणि त्याला अर्जुनाने जे उत्तर दिले आहे ते उत्तर हा माझ्या अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. अलिकडे समुपदेशन, निरनिराळे कोचेस, हिलर्स यांचे पिक भयानक फोफावले आहे. त्यात बरेचदा जो उपदेश केला जातो त्याची मूळं आपल्याला इंद्राच्या या छद्मी उपदेशात मिळू शकतात. इंद्राने येथे तरुण वयात अर्जुन तपस्येला, मोक्षाच्या साधनेला लागला आहे याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. मात्र त्याचा युद्धवेष पाहून खंतही व्यक्त केली आहे. तपश्चर्येने मोक्ष मिळवायचे सोडून तू शत्रूवर विजय प्राप्त करायची इच्छा ठेवतो आहेस हे चुकीचे आहे असे इंद्र सांगतो.

आणि इंद्राच्या भाषणाचा शेवटचा भाग तर मास्टरस्ट्रोक म्हणता येईल असा आहे. तो म्हणतो तुला शत्रूंनाच जिंकायचं असेल तर स्वतःतील षडरिपुंना जिंक. त्यांना जिंकलंस की जग जिंकल्यासारखेच होईल. आपल्यावर अन्याय झाला तरी तो सहन करावा, आपली मनःशांती ढळू देऊ नये. मोक्षाची साधना करावी अशासारखा पराक्रमाला, विजिगिषु वृत्ती संपूर्णपणे जिरवून टाकणारा हा उपदेश आहे. हा आजच्या काळातही माणसे करत असतात. शब्द वेगळे असतील. अलिकडे मानसशास्त्रात समुपदेशन करताना “दुःख हे आपल्या दृष्टीकोणावर अवलंबून असतं अन्यथा आपल्या बाहेर दुःख असं काही नसतं. त्यामुळे आपण बदलायला हवं” असा एक पवित्रा घेतला जातो. समाजशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे मला हे विधान कधीही पटले नाहीच पण ते नेहेमी हस्यास्पदही वाटत आले. गंमत म्हणजे खुद्द मानसशास्त्रात या लोकप्रिय दाव्याच्या विरोधात मत असलेलीही माणसे आहेत. (पहाःफेमिनिस्ट थेरेपी) फक्त त्यांची माहिती अनेकांना नसते. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर माहिती असली तरी ती अनेकांना झेपणारीही नसते. त्यापेक्षा दृष्टीकोण बदलला म्हणजे परिस्थिती बदलते हे स्वीकारणं जास्त सोपं असतं.

गंमत म्हणजे आपल्याला ठिकठिकणी वाईट माणसे दिसत असतात. अगदी दररोजही दिसत असतात. ती वाईट असणं हे आपल्या दृष्टीकोणावर जराही अवलंबून नसतं. त्यांचा स्वभावच विषारी असतो. आपल्याला वाईट परिस्थितीही दिसत असते. शोषण करणाऱ्या संस्था, गट, माणसेही दिसत असतात. जगातले हे दुःख सर्वस्वी आपल्या दृष्टीकोणावर अवलंबून असते असे मला कधीही वाटले नाही. आणि अर्जुनाचे इंद्राला दिलेले उत्तर असेच आहे. अर्जुन हा तत्वज्ञानाची चर्चा करणारा माणुस मला कधीही वाटला नाही. गीतेत चर्चा भगवंत करतात. अर्जुन त्याला प्रामाणिकपणे पडलेले प्रश्न विचारतो. त्यामुळे हा अजोड धनुर्धर असला तरी सरळसोट गडी आहे. त्याने पहिल्याच वाक्यात सिक्सर ठोकली आहे. तो इंद्राला म्हणतो “तुम्हाला माझ्याबद्दल काहीही माहित नसताना तुम्ही मला हा उपदेश करीत आहात. तो व्यर्थ आहे. चमचमणारे तारे पाहायचे तर दिवस योग्य नाही रात्र योग्य आहे. त्याप्रमाणे या उपदेशाला मी योग्य नाही.” पुढे अर्जुन स्वतःची ओळख देतो. पांडवांचा झालेला अपमान, द्रौपदीची विटंबना, वनवास, अज्ञातवासाची शिक्षा याबद्दल सांगतो. आम्हाला झाल्या अपमानाबद्दल किती लाज वाटते हे देखील सांगतो. अशावेळी आपले कर्तव्य काय याबद्दल अर्जुनाच्या मनात काडीचीही शंका नसते. शत्रूला पराभूत करणे हा आपला एकमेव उद्देशच नव्हे तर कर्तव्यदेखील आहे हे अर्जुन वारंवार सांगतो.

परीक्षा पाहायला आलेला इंद्र अर्थातच संतुष्ट होऊन अर्जुनाला पुढे शंकाराच्या उपासनेचा मार्ग दाखवतो. पराक्रमाची विजिगिषु वृत्तीची भलावण करणारा हा अकरावा सर्ग वाचला की माझ्या मनात नेहेमी उत्साहाचा संचार होतो. म्हणून अलिकडे तो पटकन हाताशी लागेल असा मी ठेवला आहे.

अतुल ठाकुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here