अगदी नवीन असे वेस्टर्नपट मला फारसे मानवत नाहीत. हा माझा मागासलेपणा असेल पण कठोर अशा निसर्गाशी जुळतील असे रापलेले चेहरेच आता दुर्मिळ झालेत. तो हेन्री फोंडा नाही, जॉन वेन नाही, चार्लस ब्रॉन्सन नाही आणि रँडॉल्फ स्कॉटही नाही. मात्र “अपालूसा” हा याला सणसणीत अपवाद. तसा हा पारंपरिक वेस्टर्न चित्रपट म्हणता येणार नाही. यात ती कुरणे नाहीत. पोकरवरुन होणार्या मारामार्या नाहीत. गुरेढोरे नाहीत, घोड्यांचे कळप नाहीत. मात्र त्या हॅटस आहेत, मार्शल आहे, जेल आहे, घोडे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती टिपीकल गनफाईट आहे. मार्शल आणि त्याचा जिवलग मित्र प्रदेशात शांतता प्रस्थापीत करण्याचे काम करत हिंडत असतात. कुणीही त्यांला आपली समस्या सांगावी, त्यांच्याशी करार करावा आणि तेथे असणार्या गुंडांचा बंदोबस्त करावा. अशा एका कामासाठी ही दुक्काल अपालूसा या टाउन मध्ये येते आणि सुरु होते एक चित्तथरारक कथा. ती येथे सांगण्यात अर्थ नाही. पाहण्यातच मजा आहे…..
एड हॅरीस आणि व्हीगो मॉर्टीनसन यांनी जुन्या कलाकारांची आठवण यावी असा अभिनय केला आहे. त्यात देखिल व्हीगो खासच. त्याला लूकच इतका टिपिकल दिला आहे कि तो अगदी एकोणिसाव्या शतकातलाच वाटतो. त्याने त्याच्या बोलण्याची ढबही तशीच ठेवली आहे. त्याचा आवाज, संवादफेक आणि नो नॉनसेन्स ऍटिट्यूड आपल्याला अगदी जुन्या वेस्टर्नपटातील कठोर नायकांची आठवण करुन देतो. लांबलचक गन कायम हातात वागवणारा व्हीगो या चित्रपटात लक्षात राहतो. त्यामानाने एड हॅरीस मार्शल म्हणुन कमकुवत वाटला. याचे व्यक्तीमत्व उंचेपुरे नाही किंवा तसे राकटची नाही. पण त्याने अभिनयाने ती उणीव भरुन काढली आहे. दोन्ही व्यक्तीरेखा वेगळ्या स्वभावाच्या आहेत पण चित्रपटात हे दोघे एकमेकांना पुरक आणि पोषक असेच वागताना दिसतात.
या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील नायिका. खरं तर वेस्टर्नपटात इतकी मध्यवर्ती स्त्रीभूमिकाच दुर्मिळ आणि त्या भूमिकेला इतके कंगोरे असणं हे तर फारच दुर्मिळ. “अपालूसा” बद्दल लिहायचं म्हणजे या भूमिकेतला जो वेगळेपणा आहे त्याबद्दल बोलावंच लागेल. नुसत्या त्या काळाच्याच नाही तर आजच्यादेखील काळाच्या फार पुढची गोष्ट येथे सांगितली आहे. नायिका ही जो कुणी पुरुष वरचढ ठरेल त्याबाजूला झुकते. तिला तिची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. तिला नायकाचा स्वाभिमान, बाणेदारपणा यांच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. तिला मध्येच कधितरी नायकाचा मित्र जास्त वरचढ वाटतो तर ती त्याच्याकडेही झुकते. त्याने नकार दिल्यावर त्याच्यावर संतापतेही. आणि त्याच्यावर आळ घेऊन त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते. अतिशय गुंतागुंतीचं असं हे पात्र रेने झेल्वेगरने सुरेख रंगवले आहे. रेने झेल्वेगरसारखी अभिनेत्री असल्यावर दृश्य एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते हा अनुभव आहे. या पात्रामुळेच हा वेस्टर्नपट अगदी वेगळा झाला आहे.
जो पुरुष समाजात वरचढ त्याच्यात आश्रय शोधणारी नायिका. तिचा हा स्वभाव माहित असूनदेखील तिच्या प्रेमात पार गुंतलेला मार्शल या दोघांमध्ये योग्य अयोग्य काय याचा अंदाज घेणारा मार्शलचा जिवलग मित्र व्हीगो आणि संधी मिळताच मार्शलचा पराभव करायला टपलेला खलनायक असा हा सामना आहे. खलनायकासाठी निवडलेल्या जेरेमी आयन्सने ही भूमिका प्रेक्षकांना चीड येईल इतकी प्रभावी वठवली आहे. ज्याच्याकडे पैशाचं सामर्थ्य, ज्याच्या राजकिय ओळखी तो आपला स्वार्थ कसाही साधू शकतो ही गोष्ट तर आजच्या काळालाही लागु होते. या चित्रपटातील खलनायक सर्व उपाय वापरून नायकाला नेस्तनाबूत करु पाहतो आणि अनेकदा त्यात तो यशस्वीदेखील होतो.चित्रपटाचा शेवट मात्र वेगळ्या अर्थाने अनपेक्षित. चित्रपटाची सुरुवात एका सुरेल थीमने होते आणि चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच खिळवून ठेवतो तो अगदी शेवटपर्यंत. एका वेगळ्या पठडीतला नितांतसुंदर वेस्टर्नपट.
अतुल ठाकुर