Home Blog Page 2

एका सीन बद्दल – जॅक निकलसन आणि ओम पुरी – वोल्फ

लांडग्याने चावलेल्या माणसाचे पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण लांडग्यात रुपांतर होणे ही कथाही तशी चावून चोथाच झालेली आहे. पण अशा माहित असलेल्या कथांना दिग्दर्शक “ट्रिटमेंट” कशी देतो हे फार महत्त्वाचं असतं. आणि ते रसायन जर नीट जमलं तर जबरदस्त चित्रपट बनतो. जॅक निकलसनच्या “वोल्फ” ची गणना त्याच्या ग्रेट चित्रपटांमध्ये कुणी करीत असेल असे वाटत नाही पण मला हा चित्रपट फार आवडतो. काही कलाकार त्यांच्या नुसत्या “असण्याने” सीन घेऊन जातात. जॅक निकलसन मला तसा वाटतो. सिर्फ प्रेझेंन्स काफी है. पण या चित्रपटात एका सीनमध्ये आपल्याकडचा एक बाप कलाकार ओम पुरी फक्त दोन तीन मिनिटांसाठी आला आहे. आणि सीन घेऊन गेला आहे.

नायकाला लक्षात येतं की आपल्यात लांडग्याचे काही गुणधर्म येऊ लागले आहेत. आणि ही प्रक्रिया थांबवण्यासाठी तो एका डॉक्टर कम मांत्रिकाकडे जातो. वृद्ध ओम पुरी दरवाजा उघडतो आणि या अविस्मरणीय दृश्याची सुरुवात होते. यात बरेच संवाद आहेत. जोडीला ओम पुरीचा तो खास आवाज आहेच. सारे काही इथेच सांगून सीनची मजा घालवायची नाहीय. पण एक दोन गोष्टी सांगण्याचा मोह आवरत नाहीय. एका ठिकाणी ओम पुरी चेहर्‍यावर मिस्किल हसु आणून जॅकला सांगतो “वोल्फ चावलेले सर्व जण वोल्फ बनत नाहीत. तुझ्यात मूळातच काहीतरी वोल्फसारखं असणार”. पुढे बोलताना तो सांगतो ” वोल्फ बनण्यासाठी वोल्फ चावायलाच पाहिजे असं नसतं. मियर पॅशन ऑफ वोल्फ इज इनफ”.

या दोन वाक्यात ओम पुरी वैश्विक सत्य सांगून गेला आहे असं मला वाटतं. सारं मानसशास्त्र त्यात आलंय. मूळात तुमच्या स्वभावात तो गुणधर्म असतो. पुढे परिस्थितीमुळे तो सघन होत जातो. आणि वाईटाबद्दल प्रेम असेल आणि त्याचीच सतत उजळणी असेल तर ते विचार पुढे आचारात उतरतात आणि कर्म तशीच घडून माणुस तसाच बनत जातो. आता हे अनेकांना न पटण्याची शक्यता आहे. पण एका चित्रपटात एका अमानुष गोष्टीची चर्चा होत असताना काहीवेळा अतिशय मार्मिक गोष्टींना स्पर्श केला जातो. त्यातलंच हे एक उदाहरण आहे.

अतुल ठाकुर

मर्यादांचे भान

अलिकडेच काही कामासाठी विद्यापिठात गेलो होतो. आमचे समाजशास्त्राचे प्राध्यापक भेटले. ते निवृत्त झाले होते. ते ही काही कामासाठी आले असावेत. ते आपल्या गाडीत आणि मी बाहेर असा काहीकाळ सुखसंवाद झाला. अतिशय कडवे मार्क्सवादी असलेले सर आता काहीसे निराश वाटत होते. जीवनाला अर्थ नाही. आपण त्याला जो देऊ तोच अर्थ आणि तो देखील बरोबर असेलच असं नाही याची जाणीव असायला हवी असं काहीतरी बोलत होते. या सरांशी संवाद होऊ शकतो असा माझा अनुभव होता. विद्यापिठातल्या इतर डाव्या विद्वानांबद्दल मनात अत्यंत तिरस्कार असल्याने ती मंडळी कधी भेटली तर मी बोलणे टाळतोच. यांचा एक अपवाद. ते नेहेमीचीच तक्रार करत होते पण आवाजात पूर्वीसारखा जोश नव्हता. सध्या “हाऊ टू” चा जमाना आहे “व्हाय” हा प्रश्न कुणी विचारत नाही आणि विचारला तर त्याला गप्प केले जाते. मार्क्सवादी मांडणीप्रमाणे सिस्टीममध्येच प्रॉब्लेम आहे. त्याबद्दल बोलायला कुणीच तयार होत नाही हे सरांचे दुखणे होते.

मी काय करतोय याबद्दल मी विद्यापिठात किंवा त्याच्या आवारात बोलत नाही कारण अनेक विद्वानांच्या मते “व्यसनमुक्ती” हे काम फारसे महत्वाचे नसावे. त्याने कुठे सर्वंकष क्रांती होते? सरांना सिस्टीम बदलणे महत्वाचे वाटत होते. नेमके इथेच मला गांधी महत्वाचे वाटू लागले होते. गांधींना माणसांच्या मर्यादांचे भान होते. ज्याला आवडेल, जे झेपेल असा कार्यक्रम देण्यास ते तयार होते. याचा अर्थ त्यांना सिस्टीममधल्या खाचाखोचा माहितीन नव्हत्या असं नव्हतं. जो आपल्या मर्यादेत राहून आपल्याला झेपेल तेच काम करु इच्छित असतो त्याला समाजाचे व्यापक प्रश्न माहित नसतात हा डाव्या विद्वानांचा अत्यंत आवडता गैरसमज आहे. गंमत म्हणजे याच विचारसरणीमुळे एकदा क्लास नाहीसा झाला की कास्ट आपोआपच नाहीशी होईल असे काहीजण मानत. किंबहूना उद्योगिकीकरण झाले की कास्ट नाहीशा होणार हे भाकीतही खरे झाले नाही. आज आपल्याला उद्योगिकीकरणाच्या रेट्यामुळे गाडीत आपल्याबाजूला कोण बसलंय त्याची जात नाहीत नसते आणि आपण त्याची पर्वाही करीत नाही हे खरे असले तरी राजकारणात जातींचे ध्रूवीकरण झाले आहे हे अमान्य करता येणार नाही.

जगभर मार्क्सवाद संपत आला. जेथे टिकवण्याचा प्रयत्न झाला तेथे प्रचंड रक्तपात झाला. अनेक मार्क्सवादी विद्वानांचा असा समज आहे की मार्क्सवाद इव्हॉल्व होतो आहे. मार्क्सला अभिप्रेत क्रांती जेव्हा येईल तेव्हा येईल. पण ज्याला आपल्या मर्यादेत राहून काही काम करायचे आहे त्याच्याबद्दल तुच्छता व्यक्त करणे हा आयव्हरी टॉवरमध्ये राहणाऱ्या विद्वानांचा एक आवडता छंद होऊन बसला हे नक्की. अर्थातच अशांची मान्यता आपल्या कामाला मिळावी असं मला आता वाटत नाही. याचं एक महत्वाचं कारण लोकांचे माझ्या अगदी छोट्याशा कामाबद्दल चांगले अभिप्राय येऊ लागले हे आहे. मला आज देखील कुणी म्हटले की “तुमचं व्यसनमुक्तीवरचं लेखन वाचून व्यसन सोडावंसं वाटलं”, “तुमच्या लेखनामुळे व्यसनमुक्त राहायला मदत होते” की फार समाधान वाटते. या समाधानाचे मोल कशानेही होऊ शकत नाही. सर्वंकष क्रांती यायची तेव्हा येवो. एक माणुस बदलतो तेव्हा त्या प्रमाणात समाजही बदलतो हे मला पटलंय.

अतुल ठाकुर

You can’t handle the truth…

सत्तेचं सामर्थ्य हाताशी असलं आणि एका अर्थाने absolute Power आपल्याकडे असेल तर व्यक्ती धोकादायक होते हे अनेकदा सार्वजनिक जीवनात दिसून आलं आहे. सत्ता आणि प्रांजळपणा, सचोटी, नम्रता यांचं जणू वैरच असावं. “फ्यु गुड मेन” या चित्रपटात जॅक निकलसनने साकारलेला कर्नल जेसप हे अशा व्यक्तीचे उत्तम उदाहरण. कर्नल जेसप हा करडा सेनानी त्याच्या हाताखालील सैनिकाकडून आगळीक होते म्हणून त्याला इतर दोघांकडून “कोड रेड” ची शिक्षा देववतो. ही शिक्षा म्हणजे हत्याच असते. मात्र त्याला काही त्यात चुकीचं वाटतच नाही. त्याच्या शेवटच्या भाषणात ते प्रखरपणे अधोरेखित होतं. पण त्याच्या आधीही बरंच काही घडतं ज्यात कर्नलचा अनिर्बंध सत्तेत मुरलेला स्वभाव दिसून येतो. एका प्रसंगी त्याच्याकडे कागदपत्र मागायला गेलेल्या टॉम क्रूझला कर्नल” यु हॅव टू आस्क मी नाईसली” म्हणून खडसावतो.

म्हणजे तुम्ही असाल लॉयर तर आपल्या घरचे. येथील अनभिषिक्त सम्राट मी आहे. तेव्हा माझ्याशी वागताना तुम्ही आदर दाखवायला हवा असं स्पष्टपणे सांगायला हा माणुस कचरत नाही. इथपर्यंत सर्व ठीक आहे. मात्र येथे एक वेगळाच संघर्ष आहे. अनेकांच्या भल्यासाठी काहींचा बळी द्यायला हरकत नाही या तत्वज्ञानाचा एक पदर येथे आहे. असा बळी देणे हे योग्यच आहे, नैतिक आहे शिवाय ती देशसेवा आहे असा एक दुसरा पदर देखील या चित्रपटात आहे. ध्येय योग्य असले तर मार्ग कुठलेही अंगिकारले तरी हरकत नाही. साधनशूचिता ही महत्वाची नाही, ध्येय महत्वाचे आहे या गोष्टी कर्नलच्या वागण्यातून अधोरेखित होत जातात. हा कर्नल भ्रष्ट नाही ही आणखी एक अत्यंत महत्वाची गोष्ट येथे लक्षात घ्यावी लागेल. त्याला मेडल नको, त्याला प्रसिद्धी नको त्याला काहीही नको. त्याच्या देशप्रेमावर शंका घेता येणार नाही. पण इतकं पुरेसं असतं का हा प्रश्न आहे.

हा कर्नल भ्रष्ट नसणे ही बाब आपल्याकडील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मला महत्वाची वाटते. आपल्याकडे बहुतेकवेळा स्वार्थ ही प्राथमिकता असते. त्यानंतर बाकी सारे. इथे स्वार्थ नाही. देशप्रेम कशाला म्हणायचे? देशप्रेम की दया, करुणा, मानवता असा इथे प्रश्न आहे. कर्नलचा स्वभाव पाहता दुबळ्या सैनिकाची हत्या ही अतिशय अयोग्य आणि निषेधार्ह असली तरी कर्नलच्या वागण्यात एक तार्किक संगती दिसते. अधिकाराच्या पदावर उच्चासनी बसलेली काही माणसे नाकावर माशी बसू देत नाहीत. We are in the business of saving lives असे त्याचे स्वच्छ सांगणे आहे. हा नो नॉनसेन्स माणुस कोर्टात जबाब देताना मात्र घसरतो आणि तिथे त्याच्या मुखवट्यामागचा खरा चेहरा दिसू लागतो.

दे दृष्य मूळ चित्रपटातच पाहण्याजोगे. जॅक निकलसनच्या अभिनयाने अवाक व्हायला होते इतकेच इथे म्हणतो कारण लेखाचा विषय वेगळा आहे. कोर्टात कर्नल जे बोलतो त्यावरुन त्याचे म्हणणे असे दिसते की त्याच्यासारखी माणसे देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत म्हणून सारे काही आलबेल चालले आहे. असे असताना त्याचा त्याच्या कृतीला जबाबदार धरलेच कसे जाते? जर त्याने एखाद्या माणसाची देशहितासाठी हत्या केली असेल तर ते योग्यच आहे आणि पुन्हा असा प्रसंग आला तर पुन्हा तो असेच वागेल. खरं तर सर्वांनी त्याचे आभार मानायला हवेत. तो म्हणतो, ” जो गेला त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगण्याची मुभा तुम्हाला आहे पण त्याच्या जाण्याने अनेकांचे प्राण वाचले.” पुढे अत्यंत गुर्मीत तो उत्तर देतो की मी माझं कर्तव्य केलं आणि यापुढे पुन्हा ही करेन. आपल्या हातून काही आगळीक घडली आहे असं त्याला वाटतंच नाही. आणि हे भीषण आहे अशी माझी समजूत आहे.

स्वतःच्या मतांबद्दल कडवा अभिमान असलेली आणि त्याबद्दल निःशंक असलेली माणसे कशी असहिष्णू होऊ शकतात हे कर्नल जेसपच्या वागण्यातून दिसून येते. मारला गेलेला सैनिक देशबंधूच आहे. दुबळा आहे. त्याला त्याच्या सोबतच्या सैनिकांकडूनच कर्नल मारवतो. हे प्रकरण वेगळ्या तऱ्हेने हाताळता आले असते. जीव घेण्याऐवजी इतरही कायदेशीर मार्ग होते. मात्र येथे देशप्रेमासोबत सत्तेचा कैफ, अहंकार आणि त्यामुळे आलेला निष्ठूरपणा असा ज्याला डेडली म्हणता येईल असा कर्नलचा स्वभाव बनला होता. ज्यातून एका दुबळ्या, त्याच्या अपेक्षेला न उतरणाऱ्या सैनिकाची हत्या झाली. कर्नल जेसपच्या देशभक्तीबद्दल प्रश्नच नाही. पण तुम्ही देशभक्त आहात म्हणजे तुम्हाला हवं तसं वागण्याचा परवाना मिळाला का? हा खरा प्रश्न आहे.

अतुल ठाकुर

लास्ट मॅन स्टँडिंग – You’re dead and you don’t know it.

अकिरा कुरोसोवाचा युजिंबो पाहायला मिळाला नाही. मात्र त्यावर बेतलेले चित्रपट अनेकवेळा पाहिले. त्यातला एक चित्रपट म्हणजे सर्जियो लियॉनोचा इतिहास घडवणारा क्लिंट इस्टवूड अभिनित “फिस्टफूल ओफ डॉलर्स”. पुढे ओळीने “फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर” आणि “द गुड, द बॅड अँड द अग्ली” हे सर्जिओचे आणखि दोन चित्रपट आले. आज वेस्टर्न पटात या तीन क्लासिक गणलेल्या चित्रपटांना डावलून पुढे जाताच येणार नाही.

युजिंबोच्या कथानकावर बेतलेला दुसरा चित्रपट वॉल्टर हिलचा “द लास्ट मॅन स्टँडिंग” १९९६ साली आला. या दोन्ही चित्रपटांचे साधारण कथानक म्हणजे निष्णात गन फायटर प्रवासात मध्ये लागलेल्या आडगावात थांबतो. तेथे दोन विरुद्ध टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई चाललेली असते. दोन्हीकडून पैसे उकळावे या इराद्याने हा धूर्त माणूस डबलगेम दोन्ही टोळ्यांना नाचवतो. मात्र या माणसाचा एल वीक पॉईंट असतो. तो म्हणजे स्त्रियांबद्दल सहानुभूती. एका टोळीच्या म्होरक्याने धरून ठेवलेल्या स्त्रीला सोडविण्यासाठी हा आपल्या स्वार्थावर पाणी सोडतो. आणि पुढे काय घडते ते प्रत्यक्ष पाहण्याजोगेच.

कथानक सारखेच असले तरी वॉल्टर हिलचा चित्रपट नुसताच अलिकडला नाही तर चित्रपटातील कालखंडदेखिल अलिकडला आहे. त्यात गाड्या आहेत. कोट्स आणि हॅट्स घालणारे गनफायटर्स आहेत. वॉल्टर हिलने नायकाच्या भूमिकेसाठी ब्रूस विलिसला घेऊन मास्टरस्ट्रोक मारला आहे असे म्हणावेसे वाटते. सोल्जर कट ठेवलेला ब्रूस विलिस त्या काळ्या ब्राऊन कोट आणि हॅटमध्ये शोभून दिसतो. हा चित्रपट मला विशेषकरून दिग्दर्शनासाठी पुन्हा पुन्हा पहावासा वाटतो.

संपूर्ण चित्रपट सेपिया टोनमध्ये रंगवला आहे. त्यामुळे आपोआपच विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाचा फिल येतो. सतत धूळीने भरलेले, गुंडगिरीमुळे जवळपास निर्मनुष्य झालेले गाव अंगावर येते. मध्येच मेलेल्या घोड्याचा सांगाडा पडलेला दाखवला आहे. कुणालाच कसली फिकिर नसते. गावातील बेरकी मार्शल तर कसलिच जबाबदारी घ्यायला तयार नसतो. या भूमिकेसाठी जुना कसलेला अभिनेता ब्रूस डर्नची चपखल निवड केली आहे.

काही जण पडद्यावर आले की अभिनयाच्या मेजवानीची खात्री वाटते. ब्रूस डर्न त्याच्याकडे कारला गुंडांनी नुकसान पोहोचवल्याची तक्रार घेऊम आलेल्या ब्रूस विलिसला उलट्या पावली परत पाठवतो. या गावात “यु आर ऑन युवर ओन” हे त्याचे शब्द असतात. आणि सल्ला म्हणजे येथे थांबायचं असेल तर “गेट अ फायर आर्म”.

विल्यम सॅडर्सन या गुणी अभिनेत्याला गावात हट्टाने राहिलेल्या सलून मालकाची भूमिका दिली आहे. हा भाबडा माणुस शेवटपर्यंत नायकाच्या बाजूने उभा राहतो. आपल्याकडे खलनायक प्राणचे नाव शेवटी यावे त्याचप्रमाणे यात अ‍ॅड ख्रिस्तोफर वॉकन…असे म्हणावेसे वाटते. त्याने रंगवलेला हिकी हा पुरेसा क्रूर आणि भीतीदायक वाटतो.

ब्रूस विलिसची पहिलीच गनफाईट धक्कादायक आहे. कारण असे काही होईल असे प्रेक्षकाच्या गावीही नसते. या गनफाईटचे चित्रिकरण, संकलन सारे काही अभ्यासण्याजोगे. मध्येच विद्युतवेगाने झालेल्या हालचाली तर अचानक स्लोमोशन असा आधार घेऊन हे दृश्य अतिशय परिणामकारक झाले आहे. अशा तर्‍हेच्या चित्रपटांमध्ये हिंसाचार असतोच. मात्र ब्रूस विलीसच्या गन हाताळण्याच्या कौशल्यामुळे ती दृश्ये खरी वाटतात.

एका नायकाशी कसलाही संबंध नसलेल्या अबलेमुळे झालेले रामायण हे युजिंबोचे मध्यवर्ती कथानक असावे. पण त्याला नंतरच्या दिग्दर्शकांनी दिलेली “ट्रिटमेंट” पाहणे मनोरंजक वाटते. शेवटी असे वाटते की हे कथानक आपल्या सर्वांचे आहे.

काही मतं, काही तत्त्वं आपण प्रत्येकजण बाळगत असतो. आयुष्याच्या एका टप्प्यावर कस लागतो. निवड करण्याची वेळ येते. त्यासाठी किंमत चुकवताना माणसाची कुठवर जाण्याची तयारी असते यावर सारे काही अवलंबून असते. मात्र निवड ही करावीच लागते. चित्रपटाची सुरुवातच मुळी या वाक्याने होते…It’s a funny thing. No matter how low you sink…there’s still a right and a wrong…and you always end up choosing. You go one way so you can try to live with yourself. You can go the other and still be walking around…but you’re dead and you don’t know it.

अतुल ठाकुर

कुछ दिलने कहा..

जुनी हिन्दी गाणी हा पूर्वीपासुनचा जिव्हाळ्याचा विषय. मित्रांशी चर्चा करताना माझ्याकडुन याबाबत तरी गाण्याच्या बाबतीत किंवा गायक गायिकेच्या बाबतीत पक्षपात होतोच. मात्र “कुछ दिलने कहा” वर वाद घालावासा वाटत नाही इतकं ते गाणं भावतं. लताच्या आवाजातले या गाण्याचे आर्त सुर कानावर आले की क्षणभर सारंकाही विसरुन मन भूतकाळात जातं. मला तर का कुणास ठावूक पण माझं गावी गेलेलं लहानपण आठवतं. हूरहूर लावणारी माणसं,घरं, झाडं, पानं, शेतं, गल्ली बोळ आठवतात. गरीब पण माया लावणारे आदिवासी आठवतात. एका वेगळ्याच विश्वात नेण्याची ताकद या ग़ाण्यात आहे. लताच्या दैवी आवाजाची जोड आठवणींची नवीन दालनं उघडते. ग़ाण्याची सुरवात एका हळव्या मनाची अवस्था सांगणारी आहे. हे मन अस्वस्थ होण्याइतपत प्रौढ नाही, तर अजुनही अल्लड आहे. तारुण्य साद घालतं आहे पण कसलीतरी विवशता आहे. प्रतिसाद न देण्याची…….

तीन आपापल्या क्षेत्रात अतिशय नावाजलेल्या व्यक्तींनी हे गाणं घडवलेलं आहे. लताचा आवाज, हेमंतकुमारचं संगीत आणि कैफी आझमीचं गीत असा हा विलक्षण योग आहे.

लेता है दिल अंगडाईया,

इस दिलको समझाये कोई

अरमां ना आंखें खोल दे,

रुसवा ना हो जाये कोई

पलकोंकि ठंडी सेज पर,

सपनोंकी परियां सोतीं है

ऐसी भी बातें होती है,

ऐसी भी बातें होती है……

दिलकी तसल्ली के लिये,

झुठी चमक झुठा निखार

जीवन तो सुना ही रहा,

सब समझे आई है बहार

कलीयोंसे कोई पुछता,

हसतीं है वो या रोतीं है

ऐसी भी बातें होती है,

ऐसी भी बातें होती है…….

पहिल्या चार ओळींमध्ये तरुण मनाला समजवण्याची धडपड जाणवते. कुणीतरी रागवेल म्हणून तारुण्यसुलभ, कोमल भावनांना वाट मोकळी करुन देता येत नाहीय. सारी कोवळी स्वप्नं पापण्यांच्या आडच राहतात. निसर्ग आपलं काम करतोच आहे. भावना उफाळून येतच आहेत. हा कोंडमारा कवीने अतिशय संयत शब्दांमध्ये मांडला आहे. पुढच्या ओळींत नायिका आपली व्यथा सांगताना म्हणते, मनाच्या खोट्या समाधानासाठी, सारे बेगडी खेळ चालले आहेत. वरकरणी दिसणार्‍या पोकळ बहराआड सुनं दु:ख वावरतं आहे. मात्र आजुबाजुच्या प्रत्येकाला हे खोटे मुखवटेच हवेत. त्याआड लपलेले चेहरे हसताहेत की रडताहेत हे पहायला वेळ आहे कुणाकडे?

वरकरणी साधी वाटणारी तरीही साधी नसलेली ही चाल या सुंदर गीताला हेमंत कुमारने लावली आहे. मला या संगीतकाराच्या चाली नेहेमीच वेगळ्या वळणाच्या वाटत आल्या आहेत. काहीशा संथ, खोल आणि विषयाशी एकरुप झालेल्या. “कुछ दिलने कहा” ऐकताना मन दूर निघुन जातं, वेगळ्या वाटेवर, स्वत:चीच सोबत घेउन, जुन्या आठवणी, सुख-दु:ख आठवत, शांत बसावसं वाटतं. विषारी जाळी, जळमटं दुर करुन मनाला निरामय आनंद देणारी अशी ही सुंदर चाल आहे. मन थकलं, भागलं असेल, निवांतपणा हवा असेल तेव्हा हे गाणं ऐकुन पाहावं. हळुवारपणे हे गाणं आपल्याभोवती शांत वातावरण निर्माण करतं, डोळे आपोआप मिटतात आणि ऐकणारा त्यात समरस होऊन जातो.

गाणे पाहताना त्याचे चित्रिकरणही अगदी वेगळ्याच पद्धतीने झालेले जाणवते. १९६६ चा कृष्णधवल चित्रपट. आधीच काळ्या पांढर्‍या रंगाचं गारुड गाण्यावर झालेलं. त्यात अतिशय उंच वृक्ष आणि आसपासची वनराजी, डोंगर, झाडंझुडपं, उंच वाढलेलं गवत. हे लोकेशन ज्याने निवडलं त्याला पहिला नमस्कार. मासोळीसारखे डोळे असलेली नाजुक शर्मिला. तिच्या गालावरच्या खळ्या दिसतील न दिसतील अशा. लताच्या कोवळ्या आवाजातले ते स्वर. कृष्णधवल रंगातल्या पार्श्वभूमीवर शर्मिलाची साडी जणू प्रकाशाचेच वस्त्र विणून बनवल्यासारखी वाटते. आणि प्रकाशात लपेटलेली शर्मिला हे तारुण्याचे गाणे गात असताना धर्मेंद्र तिच्याकडे दूरून पाहात राहतो. धरमसाहेब शाल लपेटून रुबाबदार देखणे दिसलेत.

लताने अप्रतिम गाणी असंख्य दिली पण माझ्यासाठी हे गाणं म्हणजे अनमोल रत्न आहे. अनेक वर्ष हिन्दी चित्रपट संगीत मी ऐकतो आहे. या संगीताचा एक छोटासा चाहता म्हणुन काहीवेळा एखाद्या गायकाची सर्वोत्कॄष्ट दहा गाणी आपण कुठली निवडू यावर विचार करण्याचा माझा छंद आहे. लताची सर्वोत्कॄष्ट दहा गाणी तर सोडाच पण संपुर्ण हिन्दी चित्रपटातली फक्त दहा गाणी मला निवडावी लागली तरीदेखील या गाण्याला मी स्थान देईन. चांगली गाणी अनेक असतात, काही लक्षात राहतात, काही विसरली जातात. मात्र आठवणींच्या हिदोळ्यांवर झुलवणारी “कुछ दिलने कहा” सारखी गाणी खरोखर दुर्मिळच!

अतुल ठाकुर

अपालूसा

अगदी नवीन असे वेस्टर्नपट मला फारसे मानवत नाहीत. हा माझा मागासलेपणा असेल पण कठोर अशा निसर्गाशी जुळतील असे रापलेले चेहरेच आता दुर्मिळ झालेत. तो हेन्री फोंडा नाही, जॉन वेन नाही, चार्लस ब्रॉन्सन नाही आणि रँडॉल्फ स्कॉटही नाही. मात्र “अपालूसा” हा याला सणसणीत अपवाद. तसा हा पारंपरिक वेस्टर्न चित्रपट म्हणता येणार नाही. यात ती कुरणे नाहीत. पोकरवरुन होणार्‍या मारामार्‍या नाहीत. गुरेढोरे नाहीत, घोड्यांचे कळप नाहीत. मात्र त्या हॅटस आहेत, मार्शल आहे, जेल आहे, घोडे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ती टिपीकल गनफाईट आहे. मार्शल आणि त्याचा जिवलग मित्र प्रदेशात शांतता प्रस्थापीत करण्याचे काम करत हिंडत असतात. कुणीही त्यांला आपली समस्या सांगावी, त्यांच्याशी करार करावा आणि तेथे असणार्‍या गुंडांचा बंदोबस्त करावा. अशा एका कामासाठी ही दुक्काल अपालूसा या टाउन मध्ये येते आणि सुरु होते एक चित्तथरारक कथा. ती येथे सांगण्यात अर्थ नाही. पाहण्यातच मजा आहे…..

एड हॅरीस आणि व्हीगो मॉर्टीनसन यांनी जुन्या कलाकारांची आठवण यावी असा अभिनय केला आहे. त्यात देखिल व्हीगो खासच. त्याला लूकच इतका टिपिकल दिला आहे कि तो अगदी एकोणिसाव्या शतकातलाच वाटतो. त्याने त्याच्या बोलण्याची ढबही तशीच ठेवली आहे. त्याचा आवाज, संवादफेक आणि नो नॉनसेन्स ऍटिट्यूड आपल्याला अगदी जुन्या वेस्टर्नपटातील कठोर नायकांची आठवण करुन देतो. लांबलचक गन कायम हातात वागवणारा व्हीगो या चित्रपटात लक्षात राहतो. त्यामानाने एड हॅरीस मार्शल म्हणुन कमकुवत वाटला. याचे व्यक्तीमत्व उंचेपुरे नाही किंवा तसे राकटची नाही. पण त्याने अभिनयाने ती उणीव भरुन काढली आहे. दोन्ही व्यक्तीरेखा वेगळ्या स्वभावाच्या आहेत पण चित्रपटात हे दोघे एकमेकांना पुरक आणि पोषक असेच वागताना दिसतात.

या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील नायिका. खरं तर वेस्टर्नपटात इतकी मध्यवर्ती स्त्रीभूमिकाच दुर्मिळ आणि त्या भूमिकेला इतके कंगोरे असणं हे तर फारच दुर्मिळ. “अपालूसा” बद्दल लिहायचं म्हणजे या भूमिकेतला जो वेगळेपणा आहे त्याबद्दल बोलावंच लागेल. नुसत्या त्या काळाच्याच नाही तर आजच्यादेखील काळाच्या फार पुढची गोष्ट येथे सांगितली आहे. नायिका ही जो कुणी पुरुष वरचढ ठरेल त्याबाजूला झुकते. तिला तिची सुरक्षितता महत्त्वाची वाटते. तिला नायकाचा स्वाभिमान, बाणेदारपणा यांच्याशी काहीही घेणंदेणं नसतं. तिला मध्येच कधितरी नायकाचा मित्र जास्त वरचढ वाटतो तर ती त्याच्याकडेही झुकते. त्याने नकार दिल्यावर त्याच्यावर संतापतेही. आणि त्याच्यावर आळ घेऊन त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते. अतिशय गुंतागुंतीचं असं हे पात्र रेने झेल्वेगरने सुरेख रंगवले आहे. रेने झेल्वेगरसारखी अभिनेत्री असल्यावर दृश्य एका वेगळ्याच पातळीवर पोहोचते हा अनुभव आहे. या पात्रामुळेच हा वेस्टर्नपट अगदी वेगळा झाला आहे.

जो पुरुष समाजात वरचढ त्याच्यात आश्रय शोधणारी नायिका. तिचा हा स्वभाव माहित असूनदेखील तिच्या प्रेमात पार गुंतलेला मार्शल या दोघांमध्ये योग्य अयोग्य काय याचा अंदाज घेणारा मार्शलचा जिवलग मित्र व्हीगो आणि संधी मिळताच मार्शलचा पराभव करायला टपलेला खलनायक असा हा सामना आहे. खलनायकासाठी निवडलेल्या जेरेमी आयन्सने ही भूमिका प्रेक्षकांना चीड येईल इतकी प्रभावी वठवली आहे. ज्याच्याकडे पैशाचं सामर्थ्य, ज्याच्या राजकिय ओळखी तो आपला स्वार्थ कसाही साधू शकतो ही गोष्ट तर आजच्या काळालाही लागु होते. या चित्रपटातील खलनायक सर्व उपाय वापरून नायकाला नेस्तनाबूत करु पाहतो आणि अनेकदा त्यात तो यशस्वीदेखील होतो.चित्रपटाचा शेवट मात्र वेगळ्या अर्थाने अनपेक्षित. चित्रपटाची सुरुवात एका सुरेल थीमने होते आणि चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच खिळवून ठेवतो तो अगदी शेवटपर्यंत. एका वेगळ्या पठडीतला नितांतसुंदर वेस्टर्नपट.

अतुल ठाकुर

दिल ढुंढता है फिर वोही फुरसत के रात दिन…

काही गाण्यांचे संगीत अशा तर्‍हेने दिलेले असते की माणुस आपोआपच गतकाळच्या स्मृतीत जातो. आणि चित्रपटातली सिच्युएशनही तशीच असेल तर मग पाहायलाच नको. त्यातही गुलजारसारखा कवि आणि दिद्गर्शक असेल, शर्मिलाटागोर आणि संजीवकुमारसारखे कसलेले कलाकार असतील, लता आणि भुपेंद्रसारखे गायक असतील आणि मदनमोहनसारखा संगीतकार असेल तर गाण्यात काय काय चमत्कार घडू शकतील हे पाहायचं असेल तर १९७५ साली आलेल्या गुलजारच्या “मौसम” चित्रपटातील “दिल ढूंढता है” हे द्वंद्वगीत पाहावे. बर्‍याच जणांना फक्त भुपेंद्रच्या गाण्याची आवृत्ती आवडली असण्याची शक्यता आहे. मलाही ते गाणे खूप आवडते. द्वंद्व गीतात तर भुपेंद्रच्या वाट्याला फक्त दोनच ओळी आल्या आहेत. पण ते ही अशा ठिकाणी खुबीने म्हटलं गेलंय की प्रेयसीला साथ देणारा प्रियकरच समोर यावा.

“फुरसतके रात दिन” शोधणारे युगुल एकमेकांत अगदी रमुन गेलेले या गाण्यात दिसतात. पण त्या आधी गुलजारने तो एक चमत्कार केला आहे. वयस्क संजीव कुमार पुर्वस्मृती जागवत अशा ठिकाणी फिरतो जेथे तरुणपणी त्याची प्रेयसी शर्मिला टॅगोर त्याच्याबरोबर असते. त्यावेळी त्याला त्याची तरुणपणची प्रतिमा प्रेयसीबरोबर दिसते आणि त्या दोघांच्या तोंडी हे गाणे गुलजारने दिले आहे. हे सारे पाहात असताना हा सीन अक्षरशः डोक्यात भिनतो. हे सारं काही इतक्या अप्रतिमरित्या चित्रीत झालं आहे कि प्रेक्षक गाण्यात गुंतून जातो. या गाण्याची सुरुवात विशेषतः लताची सुरुवातीची लकेर आणि त्यावेळचं संगीत जर डोळे मिटुन ऐकलं तर हे नक्की जाणवेल की हे गाणंच मुळात सारा स्मृतींचाच खेळ आहे. लताची लकेर येते, कॅमेरा आभाळ, बर्फाने आच्छादलेले पर्वत आणि उंच उंच झाडांवर फिरतो. संजीवकुमार आपण तरुणपणी आपल्या प्रेयसीबरोबर जेथे फिरलो होतो त्या जागा निरखत असतानाच झाडामागून पुढे येतो आणि अचानक समोरुन तरुण शर्मिला आणि संजीवकुमार समोर येतात. गाणे सुरु होते…

आपल्याच प्रतिमेला पाहणारा संजीवकुमार त्या दोघांच्या मागे मागे जात गतकाळ आठवत असतो. कधी तो स्वतःकडे पाहतो, कधी शर्मिलाकडे. कधी टेकाडावर निवांत बसून खाली एकमेकांच्या बाहुपाशात रमलेल्या दोघांना पाहतो. एकाठिकाणी हे युगुल मोठाले बुंधे असलेल्या जणु काही एकाच मुळापासून निघालेल्या दोन झाडांसमोर थांबते. ही झाडे म्हणजे दोन शरीरे आणि एकच हृदय असलेल्या त्या दोघांचे प्रतिकच. ती दोघे पुढे निघून गेल्यावर वृद्ध संजीवकुमार त्या बुंध्यावरून हात फिरवून एक निश्वास सोडतो. त्या एका कृतीत त्याची सारी खंत कळून येते. कसलेले अभिनेते असले म्हणजे आधीच सुंदर असलेल्या गाण्याला आणखी उंचावर नेतात. दोन लांब वेण्या घातलेली शर्मिला दिसली आहे सुरेखच पण तिचे सहज चालणे देखील येथे खुप लोभसवाणे झाले आहे. दोघेही तसे प्रौढ दाखवले आहेत त्यामुळे धसमुसळेपणा नाही. संयत प्रणय आहे.

लताच्या कोवळ्या आवाजाने कमाल केलीय. मदनमोहनच्या संगीतात काहीवेळी लताचा आवाज वेगळाच आकर्षक भासतो असे आपले माझे मत. भुपेंद्र “दिल ढुंढता..है फिर वोही” असे म्हणतो तर लता सरळ “दिल ढुंढताहै” असे म्हणते, ते ही मस्त वाटते. गुलजारने गालिबच्या पहिल्या ओळी घेऊन लिहिलेल्या या गीताची सुरुवात “जी ढुंढता है” अशी होती असा किस्सा आहे. मात्र मदनमोहनने या ओळी “दिल ढुंढता है” अशा बदलल्या आणि गुलजार थक्क होऊन गेला. चक्क गालिबच्या ओळींत बदल? मात्र त्यावेळचे संगीतकार देखिल असे जाणकार होते कि मदनमोहनने त्याच्याकडील गालिबच्या पुस्तकाची आवृत्ती आणली होती आणि त्याने गुलजारला पटवुन दिलं की काही आवृत्त्यांमध्ये “दिल ढुंढता है” असं आहे. शेवटी तो बदल स्विकारला गेला

एकंदरीतच अगदी वेगळे गाणे. काळाच्या पुढचे चित्रिकरण. एकमेकांच्या प्रेमात गुंतुन गेलेले प्रेमी युगुल आणी त्यांना आठवणारा, समोर पाहाणारा वृद्ध संजीव कुमार, त्यात मदनमोहनची आकर्षक चाल आणि लताने मोहकपणे म्हटलेले गुलजारचे बोल, तिला पूरक वाटणारा भुपेंद्रचा आवाज. आणखी काय हवे?

अतुल ठाकुर

ये दिन क्या आये, लगे फूल हँसने…

आनंदी स्वरातला मुकेश हा आपल्या फार ओळखीचा नाही. कारण मुकेश म्हणजे दर्द असं जणु समिकरण बनून गेलंय. दिलिपकुमार, राज कपूरने ते जास्त घट्ट केलं. पण मुकेशने सुखी माणसांची गाणीही बरीच गायिली आणि ती लोकप्रियसुद्धा झाली. “ये दिन क्या आये” हे बासु चटर्जींच्या “छोटीसी बात” मधील एक दुर्मिळ म्हणता येईल असं गाणं. रेडियोवर फारसं वाजलेलं ऐकलं नाही. कवी योगेश यांचे सिच्युएशनमध्ये चपखल बसणारे शब्द आणि त्याला दिलेली सलील चौधरींची अनोखी चाल. मूळात गाणे सुरु होते तेच अशा तर्‍हेने की ते संगीत ऐकून गाण्याचा मूड पटकन लक्षात यावा. सुकलेल्या, वर्षानुवर्ष पाणी न मिळालेल्या, तडे गेलेल्या जमिनीवर मुसळधार पाऊस पडावा आणि ती जमीन भिजून चिंब व्हावी अशी अवस्था सांगणारं हे गाणं आणि नेमकी तशीच अवस्था या चित्रपटाचा नायक अमोल पालेकर याची झालेली आहे.

लहानपणापासून आईवडिलांच्या सावलीत वाढलेल्या आणि आता एकट्या पडलेला आपला हा मध्यमवर्गीय नायक एका त्याच्यासारख्याच मध्यमवर्गीय नायिकेच्या प्रेमात पडतो. मात्र समस्या अशी असते की त्याच्या “रास्ते का कांटा” असरानी त्याच्याहून अनेक बाबतीत सवाई आणि स्मार्ट असतो. त्याला शह देण्याचे ट्रेनिंग अशोक कुमार नायकाला देतो. अमोल पालेकर त्या सार्‍या ट्रिक्स वापरून यशस्वी होतो. आणि आपल्या प्रियेला बरोबर घेऊन, तिच्या समोरच असरानीच्या स्मार्टनेसवर कुरघोडी करत त्याच्याहीपेक्षा सरस ठरतो. आणि सुरु होतं “ये दिन क्या आये…”

मुकेशचा मॅनली आवाज, अमोल पालेकर आणि विद्या सिन्हाचे अगदी हवेहवेसे वाटणारे मध्यमवर्गीय लूक्स आणि मध्यमवर्गिय वागणे, बोलणे, चालणे, चायनीज खाताना असरानीची उडालेली तारांबळ, शेवटी त्यालाच भरावे लागलेले बिल, असरानीला ताटकळत ठेऊन त्याचा राग वाढवणे, अमोल पालेकरचे टेबल टेनिस खेळतानाचे मनोरंजक सीन्स, असरानीची तारांबळ पाहताना अशोक कुमारचे मिस्किल हसणे अशी एकूणच सुरेख रंगसंगती या गाण्यात जमली आहे. मुकेशच्या आवाजात अमोल पालेकरच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात. तृषार्त धरा नुसती शांतच झाली नाही तर तीवर आता हिरवेगार कोंबही फुटले आहेत ते जाणवतं.

सोने जैसी हो रही है हर सुबहा मेरी
लगे हर सांझ अब गुलाल से भरी
चलने लगी महकी हुई पवन मगन झुमके
आंचल तेरा चूमके…ये दिन क्या आये…

मनात प्रेम थुईथुई नाचु लागलं की आपोआपच आसमंतही देखणा वाटु लागतो. आतापर्यंत दबून राहिलेल्या नायकाला आपले प्रेम प्राप्त करण्याचा मार्ग मिळाला आहे. नव्हे ते त्याला प्राप्तच झाले आहे. बाकी या गाण्यासाठी मुकेशच्या आवाजाची निवड हा मला मास्टरस्ट्रोकच वाटतो. नेहेमी दर्दभरी गाणी गाणारा आवाज म्हणून हे आनंदी गाणे त्याला दिले असेल का? नेहेमी दबून राहिलेल्या नायकाला आता आनंद झाला आहे हे त्यातून सुचवायचं असेल का? मुकेशचे आणि दर्दचे नाते माहित असल्याने त्याला खेळकर आनंदाचे, स्वप्नपूर्तीचे गाणे देऊन सलीलदांनी नायकाच्या चित्रपटातील एकंदरीत सिच्युएशनलाच कवेत घेतले आहे. मला भावले ते या गाण्यातील जोडप्याचे मध्यमवर्गिय दिसणे. यातले काहीच अंगावर येत नाही. आणि आपल्या मनात झिरपत जातो तो मुकेशचा स्वर ज्या बरोबर आपणही गुणगुणु लागतो “देखो बसंती बसंती होने लगे, मेरे सपने…”

अतुल ठाकुर

ये मुलाकात इक बहाना है, प्यार का सिलसिला पुराना है…

लता आणि खय्याम एकत्र आल्यावर चमत्कार घडतो असा अनुभव आहे. अगदी “रजिया सुल्तान” पर्यंत हा चमत्कारांचा पुराना सिलसिला सुरु राहिला होता. १९७९ साली आलेल्या “खानदान” चित्रपटाची कुणाला आठवण आहे का माहित नाही. मात्र त्यातील “ये मुलाकात इक बहाना है” हे गाणे अनेकांना आठवत असेल. हे नितांत सुंदर गाणे मला लता-खय्याम जोडीने दिलेल्या सुरेख गाण्यांमधले एक वाटते. गाणे पाहताना ज्याने चित्रपट पाहिला नाही त्यांनाही काय चालले आहे हे कळेल अशा तर्‍हेचे छायाचित्रण आहे हे दिग्दर्शकाचे कौशल्य. बाकी आम्ही काव्यशास्त्राचे विद्यार्थी. त्यामुळे समोर दिसेल त्यातून कायकाय जाणवतं हे शोधण्याची आमची हौस. कदाचित गीतकार आणि दिग्दर्शकाला ते अपेक्षितही नसेल. पण बनत असलेल्या इमारतीत जितेंद्र आणि बिंदिया गोस्वामीवर हे गाणे चित्रित झाले आहे. म्हणून असे वाटते घर नक्की कुणाचे बनणार आहे? गाणार्‍या नायिकेचे की आधीच्या प्रेयसीचे? हे तर दिग्दर्शकाला दाखवायचे नसेल?

जिंतेद्र हा मला वर्गात कधीही पहिला न आलेल्या पण फर्स्ट क्लासदेखिल न सोडलेल्या विद्यार्थ्यासारखा वाटतो. सिन्सियर विद्यार्थी. दिलेले काम इमाने इतबारे करणारा. जितेंद्रने वाईट काम केलेले मला आठवत नाही. त्याच्या चेहर्‍यावरूनच कळते की त्याला बिंदिया गोस्वामीने चालवलेले प्रणयाराधन मान्य नाही. कारण तो आधीच कुणात तरी गुंतलेला आहे. आणि नेमकी त्याची आधीची प्रेयसी इमारतीच्या खालून त्या दोघांना पाहते.गैरसमज करून घेते आणि निघून जाते. बिंदिया गोस्वामी जितेंद्रच्या प्रेमात इतकी बुडाली आहे की एका गाण्यातच काय वादळ घडून गेले याची तिला कल्पनाच नाही. “धडकने धडकनोंमें खो जायें, दिल को दिल के करीब लाना है’ असे शब्द नक्श लायलपुरी तिच्यासाठी लिहून गेले आहेत. अशा अवस्थेत असलेल्या नायिकेला आपल्या आजुबाजुला काय चालले आहे याची कल्पना कशी असणार? जितेंद्र, सुलक्षणा पंडित आणि बिंदिया गोस्वामी हे तिघेही पडद्यावरचे सिन्सियर विद्यार्थीच. पहिल्या पाचात न आलेले पण कधीही नापास देखिल न झालेले. गोड दिसणार्‍या बिंदिया गोस्वामीला प्रेक्षकांनी विद्या सिन्हाइतकेही स्विकारु नये याचे मला नेहेमी आश्चर्य वाटते.

बाकी गाणे आहे ते लता आणि खय्याम यांचेच. नक्श लायपुरींचे प्रेयसीच्या प्रेमाने भिजलेल्या हृदयाचे चपखल वर्णन करणारे शब्द आणि खय्यामचे संगीत. माणसाला सपाटून भूक लागलेली असावी आणि आवडत्या पदार्थाने शीगोशीग भरलेले ताट समोर यावे अगदी अशी भावना मला हे गाणे ऐकताना वाटते. दोन कडव्यांमधले संगीत देखिल पुन्हापुन्हा ऐकावेसे वाटणारे, कर्णमधूर. गाण्याची सुरुवातच पाण्याचे एखादे कारंजे अचानक उसळून सुरु व्हावे अशी आहे. एखाद्या निराश माणसाने हे गाणे ऐकावे. पटकन त्याच्या चित्तवृत्तीत फरक पडेल. वाद्यांचे ते सुरेख स्वर ऐकू येतात आणि पुढे लता “ये मुलाकात इक बहाना है…” गाऊ लागते. गाण्याची आणि काव्याची प्रकृती ओळखून त्या विशिष्ट भावना आवाजात आणणे हे लताबाईंइतके आणखी कुणाला जमणार? नायिका नायकाच्या प्रेमात पडली आहे.पण हे प्रेम अवखळ नाही. संयत आहे. ही नायिका स्वप्नाळू आहे. तिला वाटते की हा आपल्या दोघांच्या प्रेमाचा सिलसिला जन्मोजन्मीचा आहे. आताची भेट तर फक्त निमित्त आहे. अशी नायिका नायकाला धावत येऊन मिठी मारणार नाही. नेमके हेच भाव खय्यामने संगीतात पकडले आहेत आणि लताने आवाजात.

आमच्यासारखे रसिक मात्र लता आणि खय्याम दोघांच्या प्रेमात आहेत. या गाण्याच्या निमित्ताने आमची या दोघांशी पुन्हा एकदा झालेली ही भेट. ही भेट देखिल एक निमित्तच आहे. कारण लता आणि खय्याम या दोघांबरोबर चाललेला आमचादेखिल प्यार का सिलसिला फार फार पुरानाच आहे.

अतुल ठाकुर

मुक्तांगणचे ज्ञानभांडार, ढवळेसर

डॉ. अनिता अवचट यांना पाहण्याचे भाग्य मला लाभले नाही. मुक्तांगणला गेल्यावर ही खंत नेहेमी जाणवते. एवढा दुरचा विचार करणारी व्यक्ती कशी असेल? त्यांच्या बद्दल फक्त आदर आणि भक्तीभावच वाटु शकतो. मात्र त्यांना जरी पाहिलं नाही तरी त्यांच्या तालमीत तयार झालेल्या माणसांना भेटण्याचा योग आला आहे. ढवळेसरांबद्दल माधवसरांनी अगोदर कल्पना दिली होतीच. ते मुक्तांगणच्या फॉलोअप विभागाचे प्रमुख आहेत. कर्‍हाड, सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर आणि बेळगाव येथील फॉलोअप ग्रुप ते चालवतात. शिवाय पुण्यातल्या कॉउंसिलिंग सेंटरची जबाबदारी त्यांच्यावर आहेच. मुक्तांगणतर्फे इतर समुपदेशक महाराष्ट्रात जी फॉलोअप केंद्रे चालवतात तेथे दरवर्षी एकदा ते भेट देतात. एवढी मोठी जबाबदारी असलेले आणि दर महिन्याला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पालथा घालणारे ढवळे सर कसे असतील याबद्दल साशंक होतो. मोठ्या माणसांचा अनेकदा अत्यंत कडवट अनुभव आलेल्या माझ्यासारख्याच्या मनात काही तितक्याच कडवट कल्पना मोठ्या लोकांबद्दल असतात आणि दुर्दैवाने बरेचदा त्या खर्‍याही निघतात. पण ढवळे सरांनी सानंदाश्चर्याचा धक्का दिला. त्यांच्या सार्‍या व्यक्तीमत्वावर या मोठेपणाची छाया कुठेही दिसली नाही. खेळकर, मिस्किल असलेले ढवळेसर मुक्तांगणच्या प्रांगणात येऊन अनेकांशी सहजपणे बोलताना दिसले. माझ्यासारख्याशी बोलतानादेखिल आपल्या एखाद्या सहकार्‍याशी बोलावं त्या सहजतेने ते बोलले. आणि त्यामुळे त्यांनी मलाही नकळत मोकळं करुन टाकलं. मुक्तांगणमध्ये व्यसनी माणसांचा इगो मोडणे हे एक महा कर्मकठीण काम मानलं जातं. जो पर्यंत व्यसनाचा स्विकार होत नाही तोपर्यंत त्यावर उपचार करणे कठीण जाते. व्यसनमुक्तीतला हा फार महत्त्वाचा टप्पा आहे. पण रुग्णांच्या आधी ढवळेसरांसारख्यांनी स्वतःतला इगो संपूर्णपणे नाहीसा केल्याचं चित्र दिसत होतं. आणि ते बरोबरच होतं. डॉ. अनिता अवचट यांनी गांधीवादाच्या पायावर मुक्तांगणची उभारणी केली होती. “जगात जो बदल तुम्हाला घडवायचा आहे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण तुम्ही स्वतः व्हा” या अर्थाचे गांधींचे एक वाक्य आहे. ढवळे सर स्वतः त्याचे उदाहरण आहेत. बाकी आपला मोठेपणा जराही जाणवु न देणारे ढवळे सर बोलु लागले कि त्यांच्यातलं अतिशय खोल पाणी दिसु लागतं आणि मग माझ्यासारख्या संशोधनासाठी गेलेल्याला त्यातुन काय घेऊ आणि किती घेऊ असं होऊन जातं.

ढवळेसरांशी ओळख झाल्यापासुन काही कठीण वाटणारे प्रश्न त्यांच्याकडे जाऊन विचारण्याची सवय लागली आहे. अतिशय व्यस्त अशा आपल्या दिनक्रमातही ते मला वेळ देतात आणि माझा कंटाळा करीत नाहीत हे मला येथे आवर्जुन नमुद करायला हवं. मुक्तांगणच्या उपचारपद्धतीत अल्कहोलिक अ‍ॅनोनिमस संस्थेचं महत्त्व खुप आहे. किंबहुना मुक्तांगणचे अनेक व्यसनमुक्त रुगणमित्र तेथील मिटिंग्ज नियमित अटेंड करणारे आहेत. मला हा प्रश्न पडत असे कि जर कोपर्‍या कोपर्‍यावर एएची केंद्रं आहेत तर लोकांनी मुक्तांगणमध्ये कशासाठी यायचं? यावर ढवळे सरांनी सविस्तर उत्तर दिलं. एएचं महत्त्व आहेच. पण एए व्यसनाव्यतिरिक्त इतर प्रश्नांमध्ये हात घालत नाही. मुक्तांगणने व्यसन हा कुटुंबाचा आजार मानला आहे. मुक्तांगणमध्ये रुग्णमित्रांच्या उपचारांच्या दरम्यान त्याच्या संपुर्ण कुटुंबाला सामिल केलं जातं. हा अतिशय महत्त्वाचा फरक या दोन संस्थांमध्ये आहे. व्यसनाच्या दरम्यान कुटुंबाची वाताहात झालेली असते. मुले घाबरलेली असतात. आईवडिलांना दु:ख झालेले असते. पत्नीला सततच्या तणावामुळे शारिरीक, मानसिक आजार जडलेला असण्याची शक्यता असते. सारे दु:ख मनातल्या मनात साठुन राहिलेले असते. त्याचा निचरा झालेला नसतो. पुढे पती व्यसनमुक्त झाल्यावर त्याची व्यसनमुक्ती कशी टिकवुन धरायची याची तिला कल्पना नसते. या सार्‍यांचे प्रशिक्षण तिला मुक्तांगणमध्ये मिळते. तिच्या दु:खाचा निचरा होतो. आपल्या हक्काचे कुटुंब आणि मैत्रिणी तिला मुक्तांगणमध्ये मिळतात. याशिवाय मुक्तांगणमध्ये नातेसंबंध कसे टिकवावेत, पैसा, वेळ यांचे नियोजन कसे करावे अशा तर्‍हेची अनेक वर्कशॉप्स होतात. त्याचे महत्त्व तर अपार असते. ढवळेसरांनी माझी एक शंका समुळ नाहिशी केली होती. दुसरी शंका “रॉकबॉटम” बद्दल होती. हा व्यसनाच्या परिभाषेतला एक महत्त्वाचा शब्द. व्यसनाचा अगदी तळ गाठलेल्या अवस्थेला रॉकबॉटम गाठणे म्हणतात. ही अवस्था प्रत्येकासाठी वेगवेगळी असु शकते. आणि बरेचदा हा रॉकबॉटम गाठलेल्या व्यक्तींना मुक्तांगणमध्ये यावंसं वाटतं. त्यांना कुठेतरी जाणवतं कि आपल्या व्यसनाने आता परिसिमा गाठली आहे. आता आपण थांबायला हवं. ते आले नाही तर त्यांचे कुटुंबिय त्यांना आणतात. पण आजकाल या रॉकबॉटमची व्याख्याच बदलुन गेली आहे. हा प्रश्न माझ्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

चर्चा करताना एकजण म्हणाला होता कि पुर्वी रॉकबॉटम म्हणजे दारुसाठी पैसे नसणे, त्यासाठी हात पसरावे लागणे, मुलेबाळे, संसार अक्षरशः रस्त्यावर येणे अशातर्‍हेचा असे. आता आयटी कंपनीत काम करणार्‍या माणसावर बहुधा ही वेळ येत नाही. भरपुर पगार असतो. पत्नीही तेवढाच पैसा मिळवत असते. पैशाच्या कमतरतेमुळे येणार्‍या रॉकबॉटमची चर्चा जेव्हा जुनी माणसे करतात तेव्हा हे नवे व्यसनीरुग्णमित्र त्या अनुभवाशी रिलेट असे होणार? हा अनुभव त्यांना येणारच नसतो. हा प्रश्न मला निरुत्तर करणारा होता. मात्र ढवळेसरांना उत्तर देताना क्षणाचाही वेळ लागला नाही. ते शांतपणे म्हणाले,” रॉकबॉटम फक्त पैशाच्याच बाबतीत असतो असं थोडंच आहे? बायका मुलं विचारत नाहीत. आई वडिल बोलत नाहीत. कामावर चुका होतात. सहकारी मित्र टाळु लागतात. समाजात बदनामी होते. पत्नी घटस्फोट देते. या सार्‍या गोष्टी पैसा मुबलक प्रमाणात असताना देखिल घडु शकतात. हा देखिल व्यसनातला रॉकबॉटमच आहे. काळ बदलत चालला तशी रॉकबॉटमची कल्पना बदलली असेल. पण व्यसनात हा टप्पा केव्हातरी येतोच. फक्त प्रत्येकाच्या बाबतीत तो वेगवेगळा असुन शकतो.” ढवळेसरांनी एक उदाहरणही दिलं. व्यसनात बुडालेल्या एका अतिशय श्रीमंत माणसाच्या आईने त्यांना आपल्या मुलाला भेटुन समजवण्याची विनंती केली होती. ते गेले तेव्हा साहेबांचं मद्यपानच चाललं होतं. साहेबांनी नाखुशीनेच ढवळे सरांना बसायला सांगितलं आणि आपण स्कॉचशिवाय कुठलिहि दारु पित नाही हेही सुनावलं. काही वेळाने सर जायला निघाले तेव्हा त्यामाणसाची छोटी मुलगी तेथे आली. तिची खेळकरपणे विचारपूस करत असताना ती छोटी आपल्या वडीलांसमोरच म्हणाली की माझ्या वडिलांकडे मला संध्याकाळी सातनंतर जायला आवडत नाही. त्यावेळी ते दारु पित असतात. मुलिच्या तोंडचे वाक्य ऐकुन साहेब खजिल झाले आणि तेथे सारा ताठा उतरलेला एक बाप उरला. त्यांनी ढवळेसरांसमोर मान्य केले कि आज माझ्याकडे सारे काही आहे पण माझी मुलगी खुश नाही. रॉकबॉटम श्रीमंत माणसांचाही असु शकतो आणि तो कशा तर्‍हेचा असतो हे मला या उदाहरणाने कळुन आले.

सागरसरांबरोबर बोलताना त्यांनी मला ढवळेसरांचे ग्रुप आवर्जुन अटेण्ड करायला सांगितले होते. थोडा उशीरच झाला होता. वरच्या मजल्यावर ग्रुप सरु झाला होता. ढवळेसर एका साध्या खुर्चीवर बसुन बोलत होते. सभोवताली बेडवर रुग्णमित्र बसले होते. वर फळा होता. आपल्या विषयात पारंगत असलेल्या एखाद्या कसलेल्या प्रोफेसरप्रमाणे ढवळेसरांचा ग्रुप सुरु झाला होता. आजचा विषय होता “डिसीज कन्सेप्ट”. व्यसन कसं सुरु होतं, कसं वाढतं? त्याचे प्रकार किती असतात, पुढे ते कुठल्या टप्प्याने वाढत जातं याची शास्त्रीय माहिती ढवळे सर अतिशय साध्या भाषेत देत होते. बरोबरच उदाहरणे देऊन मुद्दा स्पष्ट केला जात होता. हळुहळु रुग्णमित्रांना त्यात ओळखिच्या खुणा दिसु लागल्या. त्यांच्या माना डोलु लागल्या. सांगितलेले पटु लागले. कुठेतरी हास्याची कारंजी उडु लागली. व्यसनाचा आजार किती घातक आहे हे सांगताना त्यांनी अमेरिकेत घडलेले एक उदाहरण दिले. एका मुलाला चौदाव्या वर्षी दारुची सवय लागली आणि त्याचे व्यसनात रुपांतर झाले. पुढे त्यावर उपाय होऊन तरुण झालेल्या त्या मुलाने विसाव्या वर्षी दारु सोडली. त्यानंतर जवळपास पन्नास वर्षे तो माणुस दारुला शिवला नाही. वयाच्या सत्तराव्या वर्षी त्याने फक्त दोन पेग घेतले आणि पन्नास वर्षे दारुपासुन दुर राहिलेल्या या माणसाला बहात्तराव्या वर्षी व्यसनामुळे मृत्यु आला. ढवळेसरांकडे अशा अनेक गोष्टींचा साठा आहे. ते मुक्तांगणमध्ये दाखल झालेल्या, फक्त ३१ डिसेंबरला पिणार्‍या माणसाची चर्चा करतात. फक्त एकच दिवस पिणार्‍याला मुक्तांगणची गरज का भासली? कारण उरलेले ३६४ दिवस तो माणुस कधी ३१ डिसेंबर येईल आणि मला कधी दारु प्यायला मिळेल याचाच विचार करीत होता. सरांच्या ग्रुप मध्ये आणि त्यांच्या व्यसनाबाबतच्या एकंदरीत अ‍ॅप्रोचमध्ये मला एक वेगळेपणा जाणवला. व्यसन हा आजार आहे. व्यसन वाईट असते. व्यसनी माणुस वाईट नसतो हे आपण अनेकदा ऐकतो. पण बरेचदा ते ऐकण्यापुरतेच असते. सरांनी मात्र ही दोरी घट्ट पकडली आहे. व्यसनीमाणुस हा माणूस म्हणुन वाईट नसतो हे सांगण्यावर ते आवर्जुन भर देतात. ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. कारण व्यसनीमाणुस हा समाजात बदनाम झालेला असतो. घरात, मित्रांमध्ये त्याने आपली पत गमावलेली असते. आपण वाईट आहोत हे सतत ऐकुन त्याचा आत्मविश्वास नाहिसा झालेला असतो. स्वतःबद्दलचा आदर त्याने गमावलेला असतो. अशावेळी ढवळेसरांचा सकारात्मक दृष्टीकोण मदतीला येतो.

ढवळेसर सांगु लागतात. व्यसन हा भावना आणि विचारांचा आजार आहे. व्यसनी माणुस वाईट नसतो. मात्र व्यसनाच्या दरम्यान त्याचे भावनांवरचे नियंत्रण नाहीसे होते. आपल्या सर्वांच्या शरिरात एक अननोन फॅक्टर असतो जो व्यसनी माणसात कार्यरत झालेला असतो. ज्यांच्या शरिरात तो कार्यरत होत नाही ती माणसे दारु पिऊनदेखिल आयुष्यभर सोशल ड्रिंकरच राहतात. व्यसनीमाणसाला मात्र बाटलीचे झाकण बंद करता येत नाही. त्याचे शरीर आणखि दारुची मागणी करीत राहते. हे त्या अननोन फॅक्टरमुळे घडते. पुढे ढवळेसर उदाहरण देतात. व्यसनीमाणसाला बायको सकाळी पन्नास रुपये देऊन दुध आणायला सांगते. त्याचे हात कापत असतात. त्याला उतारा हवा असतो. तो प्रामाणिक विचार करतो. फक्त दहा रुपयाची दारु पिऊया आणि चाळीस रुपयांचे दुध आणुया. हात कापायचे थांबतील. या विचारांपर्यंत तो प्रामाणिक आहे. ढवळेसर प्रामाणिक हाच शब्द वापरतात. तो दहारुपयांची दारु पितो. तेथे हा फॅक्टर कार्यरत झालेला असतो. त्याचे शरिर आणखि मागणी करु लागते. पुढे तो विचार करतो आणखि दहा रुपयांची दारु पिऊया आणि स्वस्तातले तीस रुपयांचे दुध घरी नेऊया. अजुनही घरच्यांचा विचार त्याच्या डोक्यात असतोच. पण हा फॅक्टर इतका बलवान असतो कि त्याच्या हातुन सारे पैसे खर्च होतात. समाज व्यसनी माणसाला एका झटक्यात बेजबाबदार, दुर्वर्तनी, वाईट म्हणुन निकालात काढतो ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे हे ढवळेसर वारंवार अधोरेखित करतात. सतत बोलणी खाण्याची सवय झालेल्या व्यसनी माणसाला यामुळे किती दिलासा मिळत असेल याची कल्पना मला तेव्हा आली. आपले सुद्धा व्यसनाबद्दल किती गैरसमज होते हे देखिल स्वच्छपणे उमगले. मुक्तांगणमध्ये व्यसन हा आजार आहे, तु वाईट नाहीस तुझे व्यसन वाईट आहे हे व्यसनीमाणसाच्या मनावर नेहेमी बिंबवलं जातं. ज्या अननोन फॅक्टरमुळे हे शरिर दारुची मागणी करते तो फॅक्टर नियंत्रणात ठेवता येतो. तो कसा नियंत्रणात ठेवता येईल हे शिकवलं जातं. ग्रुपच्या शेवटी रुग्णमित्रांनी अनेक शंका विचारल्या. ढवळे सरांनी त्यांचे समाधान केले. सरांचे समजवणे हे सहज आहे. त्यात कसलाही अट्टाहास नाही. टोकाचा आग्रह नाही. समोरच्या बसलेल्या रुग्णमित्रांपैकी काही जण पुन्हा दाखल झाले होते. त्यांचा इतिहास सरांना ठाऊक होता. खेळकरपणे त्यांना अधुनमधुन चिमटा काढीत हा ग्रुप सरांनी घेतला होता. वातावरण अतिशय हलकेफुलके झाले होते.

ढवळेसरांकडुन मोठ्यामॅडम म्हणजे डॉ. अनिता अवचट यांच्याबद्दल खुप काही ऐकायचं आहे. समजुन घ्यायचं आहे. जवळपास पंचविस वर्षे व्यसनापासुन दुर राहिलेले ढवळे सर मोठ्या मॅडमच्या शिकवणुकीत तयार झाले. समुपदेशन कसे असावे याचे धडे त्यांनी मॅडमकडे गिरवले. आपला पेशंट स्लीप झाला याचं अतिशय दु:ख झालेल्या ढवळे सरांना मॅडमनी कानमंत्र दिला होता. पेशंटला मदत करायची असेल तर त्याच्यात अडकु नकोस. माझा पेशंट बरा झलाच पाहिजे या वाक्यातला “च” काढुन टाक. प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. देत राहणं हे तुझं काम आहे. जर ते बरे झाले तर पाच टक्के तुझे प्रयत्न आणि पंच्याण्णव टक्के त्यांचे प्रयत्न असे मान. जर ते बरे झाले नाहीत तर तात्पुरते तरी १००% टक्के तुझेच अपयश आहे असे मान. तरच त्यांना पुन्हा मदत करशील. मॅडमची ही शिकवण सरांच्या समुपदेशनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आज सर साठीच्या जवळपास आलेत पण त्यांच्या खेळकरपणाचाच परिणाम असेल कदाचित पण ते साठीचे मुळीच वाटत नाहीत. मुक्तांगणमध्ये त्यांना प्रेमाने तात्या म्हणुन हाक मारतात. काहीवेळा तरुण समुपदेशक त्यांची त्यांची खेळकर थट्टाही करतात. पण समस्या आली की तात्यांशिवाय पर्याय नसतो. अतिशय जुने रुग्णमित्र सरांच्या संपर्कात आहेत. त्यांचं नेटवर्क प्रचंड आहे. सरांच्या ज्ञानाला पंचविस वर्षांच्या डोळस अनुभवाची जोड आहे. सरांचे नाव प्रसाद आहे. मला आजवर देवाचा प्रसादच माहित होता. पण अनुभवाच्या कसोटीवर घासुन पक्क्या झालेल्या, इतक्या वर्षाच्या पायपीटीतुन तावुन सुलाखुन निघालेल्या ज्ञानाचा प्रसाद ते माझ्यासारख्याला आपलेपणाने देत असतात. संशोधन करताना मुक्तांगणने सरांच्या रुपाने आपले ज्ञानभाण्डारच माझ्यासाठी खुले केले आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर